अलिबाग | अतिवृष्टीमुळे दरड कोसळून गावातील एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. मदतीच्या निमित्ताने शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मानसी दळवी आणि शेकापच्या नेत्या चित्रलेखा पाटील दोघीही घटनास्थळी पोहचल्या. मात्र तेथे गेल्यानंतर चित्रलेखा पाटील यांनी सत्ताधार्यांच्या नावाने खरी खोटी सुनवायला सुरुवात केली.
त्यांनी पन्नास खोके...असा उल्लेख केला आणि मानसी दळवी यांचा संताप अनावर झाला. त्यांनी जाब विचारत चित्रलेखा पाटील यांना धक्का दिला. त्यामुळे काही काळासाठी वातावरण तंग झाले होते. मुरुड तालुक्यातील मिठेखार गावात मंगळवारी (१९ ऑगस्ट) सकाळी दरड कोसळून विठा मोतीराम गायकर (वय ७५) यांचा जागीच मृत्यू झाला. गावावर दुःखाचे आणि भितीचे सावट पसरले होते.
गावामध्ये आक्रोश आणि हळहळ व्यक्त करण्यात येत होती. गावकर्यांच्या मदतीसाठी भाजपचे नेते अॅड.महेश मोहिते, शिवसेनेच्या नेत्या, आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी घटनास्थळी पोहोचल्या होत्या. सरकारी अधिकारीदेखील पाहणी करुन निघून गेले. मृत महिलेच्या कुटुंबाचे सांत्वन करुन निघणार इतक्यात, शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील या त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह घटनास्थळी पोहचल्या. त्यांनी सत्ताधार्यांवर टिका करण्यास सुरुवात केली.
"जो दोषी आहे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, किती दिवस तो चिखलातला रस्ता आम्ही सहन करणार? आमच्या जीवनाची काही किंमत आहे की नाही?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्याचवेळी त्यांनी पन्नास खोके...याचाही उल्लेख करत दळवी यांना डिवचले. चित्रलेखा पाटील यांनी ‘पन्नास खोके’चा विषय छेडला, तेव्हा मानसी दळवी या त्यांच्या मागेच उभ्या होत्या. त्यांनी चित्रलेखा पाटील यांना हात लावत, मागे वळविण्याचा प्रयत्न केला आणि ‘पन्नास खोके, पन्नास खोके कशासाठी बोलत आहेस?’ असा प्रश्न केला.
यावर ‘हात लावायचा नाही’ असे म्हणत चित्रलेखा पाटील यांनी आवाज चढविण्यास सुरुवात केली. यानंतर मानसी दळवी यांनी चित्रलेखा पाटील यांना धक्का दिला. या दोन महिला नेत्यांमध्ये हातापायी होत असल्याचे लक्षात येताच दोन्हीकडचे कार्यकतही आक्रमक झाले. त्यामुळे वातावरण तंग झाले होते. अॅड.महेश मोहिते, शिवसेना ठाकरे गटाच्या राजेश्री मिसाळ यांनी हा वाद सोडविण्याचा प्रयत्न केला.
झाला प्रकार पाहून गावकरीही संतापले होते. ‘मदत नको; पण तुम्ही गाव सोडा’ असे म्हणण्याची वेळ गावकर्यांवर आला. मृत महिलेच्या पार्थिवाशेजारीच महिला नेत्यांमध्ये राजकीय झालेल्या राड्यानंतर ग्रामस्थांनीही संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत आ.महेंद्र दळवी यांनी शेकापच्या चित्रलेखा पाटील यांचा पराभव केला होता. याची बोच त्यांना असावी; मात्र राजकीय वाद करण्यासाठी ही जागा आणि वेळ नव्हती, अशी चर्चा सुरु झाली आहे.
अतिवृष्टीमुळे दरड कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. अतिशय दुर्दैवी घटना होती, त्यामुळे सर्वांनीच गामस्थांच्या मागे उभे राहणे अपेक्षित आहे. आम्हीदेखील यासाठीच गेलो होतो. शेकापच्या चित्रलेखा पाटील या तेथे आल्या. दुःखी कुटुंबाचे सांत्वन नाही, दुर्घटना कशी घडली? पाहिले नाही. थेट राजकीय भाषण करायला लागल्या. बरं बोलताना, विनाकारण त्या नको तिकडे घसरल्या. बोलताना मर्यादा सांभाळल्या नाहीत तर जवाब मिळणारच. - मानसी दळवी, शिवसेना नेत्या
या घटनेमध्ये राजकारण आणता कामा नये. परंतू जो दोषी आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. किती दिवस तो चिखलातला रस्ता आम्ही सहन करणार? आमच्या काही जीवनाची किंमत आहे की नाही. गरीब माणसाच्या जीवाची काय किंमतच नाही. दोन लोकांना स्थलांतरीत करायचे आहे. त्यांचा महिनाभराचा खर्च आम्ही करु. --चित्रलेखा पाटील, शेकाप प्रवक्त्या