कर्जत | घर कोसळले, दोन घरांच्या भिंती कोसळल्या

By Raigad Times    20-Aug-2025
Total Views |
 karjat
 
कर्जत | मुसळधार पावसामुळे कर्जत तालुक्यातील एका आदिवासी कुटुंबाचे घर कोसळले असून भर पावसात हे कुटुंब उघड्यावर आले आहे. तर सोमवारी (१८ ऑगस्ट) रात्री अन्य दोन शेतकर्‍यांच्या घराच्या भिंती कोसळल्याच्या घटना घडल्या. तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायतीमधील आशाणे ठाकूरवाडीमधील एका आदिवासी कुटुंबाचे घर पावसामुळे कोसळले आहे.
 
येथील रामा गोमा खडके यांचे हे घर असून या कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. खडके यांच्या घरातील साहित्य पावसाच्या पाण्यात भिजले असल्याने महसूल विभागाने तातडीने उपाययोजना करुन मदत करावी, अशी मागणी केली जात आहे. तर सावेळे येथील मंगेश सोनवणे यांच्या घराची भिंत कोसळली तर तलाठी सजा गौरकामत बारणे येथील भाऊ नागो मोडक यांच्या घराचीही भिंत कोसळून अंशतः नुकसान झाले आहे.
 
मंगळवारी सकाळी महसूल कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. कर्जत तालुक्यात कर्जत शहरातील कचेरी खालील मुद्रे गाव, सांगवी, उमरोली, पाली वसाहत, नेरळ ग्रामपंचायतीमधील आंबेवाडी या दरडग्रस्त गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. पळसदरी भागातील ठाकूर वाडी हीदेखील दरडीच्या छायेत आहे. मात्र प्रशासनाने कोणत्याही कुटुंबाचे स्थलांतरण केले नसल्याची माहिती तहसीलदार डॉ.धनजंय जाधव यांनी दिली आहे.