अतिवृष्टीमुळे उरणमधील घरांची पडझड; रस्ते पाण्याखाली

By Raigad Times    20-Aug-2025
Total Views |
 uran
 
उरण | तीन दिवसांपासून कोसळणार्‍या पावसाचा तडाखा उरण तालुक्याला बसला असून अनेक रहिवाशांच्या घरांची पडझड झाली आहे. रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहन चालक बेजार झाले आहेत. झाडे उन्मळून पडली आहेत. विशेष म्हणजे न्हावा शेवा पोलीस ठाण्याच्या इमारतीत पावसाचे पाणी शिरल्याची घटना घडली आहे.
 
पावसामुळे रानसई, मोठी जुई, पिरकोन, चाणजे, जासई, सारडे, कोप्रोली, चिरनेर या ग्रामपंचायत हद्दीत कौलारु घरे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली तरी रहिवाशांचे आर्थिक नुकसान झाले आहे. उरण जेएनपीए बंदराला जोडणारे नवी मुंबई, पनवेल शहराकडील रस्ते पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे. उरण महसूल विभागाच्या माध्यमातून सदर नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याची माहिती उरण तहसील कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे.