अलिबाग | रायगड जिल्ह्यात आज सलग पाचव्या दिवशी पावसाची संततधार सुरु होती. दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. नागोठणे आणि महाडमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. रोहा, पेण, अलिबाग, माथेरान, माणगाव, तळा, पोलादपूर, श्रीवर्धन या तालुक्यांत सर्वांधिक पाऊस पडला. मुरुडमध्ये सर्वांत कमी पाऊस पडला.
नवी मुंबई, पनवेलमध्येही पावसाने अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी होताना दिसत होती. रायगडात आजदेखील (१९ ऑगस्ट) हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांना जिल्हाधिकार्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. राज्यात पुढील २४ तासांसाठी मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट या भागात ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.
किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा
भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रातर्फे रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना आज, १९ ऑगस्ट रोजी साडेआठ ते २० ऑगस्ट रात्री साडेआठ यादरम्यान ३.५ ते ४.२ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे.
या कालावधीत समुद्राची स्थिती खवळलेली व ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समुद्राची धूप आणि उंच लाटांचे तडाखे समुद्रकिनारी येण्याचा इशारा देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून जिल्हा प्रशासनामार्फत सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली आहे.