नागोठणे, महाडमध्ये पूरपरिस्थिती! अंबा नदी, सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली

19 Aug 2025 17:00:46
 nagothane
 
नागोठण | सतत कोसळणार्‍या मुसळधार पावसाने सुधागड तालुका व रोहा, नागोठणे परिसराला अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे दोन ते तीन दिवसांपासून दुथडी भरुन वाहणार्‍या नागोठणे येथील अंबा नदीने शेवटच्या श्रावणी सोमवारी (१८ ऑगस्ट) रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास धोक्याची पातळी ओलांडली.
 
नागोठणे येथील अंबा नदीला आलेल्या पुराचे पाणी नदी काठावरील सखल भागात शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. मिनीडोर रिक्षा सेवा पूर आल्याने बंद करण्यात आली होती. त्यांनी एसटी मुंबई-गोवा महामार्गावर आपल्या रिक्षा उभ्या ठेवल्या होत्या. बस स्थानकात पुराचे पाणी शिरल्याने तसेच वन विभागाच्या कार्यालयापुढे व हॉटेल लेक व्ह्यूसमोर मुख्य रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने एसटी बसची वाहतूक पूर्णपणे कोलमडली होती.
 
त्यामुळे यावेळी रोज स्थानकात येणार्‍या एसटी बस शहराबाहेरील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील मुंबई-गोवा महामार्गावर थांबविण्यात येत होत्या. पूर आल्याने सखल भागातील लहान मोठ्या दुकानदारांची तारांबळ उडाली होती. यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून नदी काठावरील सखल भागातील दुकानदारांकडून आपला माल सुरक्षितस्थळी हलविण्यात येत होता. दरम्यान, मुसळधार पावसामुळे अंबा नदीला आलेल्या पुरामुळे नागोठणे शहर व परिसरातील विद्यार्थ्यांची चांगलीच गैरसोय झाली.
 
याचबरोबर नागोठणे परिसरातून दैनंदिन वस्तू खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांनादेखील या पुराचा फटका सहन करावा लागला. सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अंबा नदीला आलेल्या पुरामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सरपंच सुप्रिया संजय महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे ग्रामपंचायत प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली.
 
mahad
 
महाड | गेल्या ४८ तासांपासून रायगड जिल्ह्यासह महाबळेश्वर विभागात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे महाड तालुक्यातील काळ आणि सावित्री नदीने धोक्याची पातळी गाठली असून महाड शहराच्या सखल भागात सोमवारी दुपारनंतर पुराचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती. पावसाचा जोर असाच कायम राहीला तर महाड बाजारपेठेसह तालुक्यातील नदीकाठी असणार्‍या गावांमध्ये पूराचे पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
महाड तालुक्यात गेल्या ४८ तासात २०२ मिमी पावसाची नोंद झाली असून आत्तापर्यंत २२०५ मिमी पाऊस झाला आहे. सोमवारी सकाळपासून पावसाची सततधार कायम असल्याने सावित्री काळ नदीच्या पात्राने धोक्याची पातळी गाठली आहे. महाड नगरपरिषदेने सायरन वाजवून जनतेला सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला.
 
रायगड व करमर परिसरात झालेल्या धुवाँधार पावसामुळे सांदोशी व बावळे गावाला जोडणार्‍या पुलावरून पाणी वाहू लागल्याने या गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला होता. सोमवारी झालेल्या पावसात वरंध, धरणवाडी येथील अर्जुन धनावडे यांच्या घराची भिंत कोसळली असून अंशतः नुकसान झाले आहे.
 
सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. दुपारनंतर महाड शहरातील सुकट गल्ली व दस्तुरी नाका ते नातेखिंड दरम्यानच्या रस्त्यावर पुराचे पाणी आले होते. महाबळेश्वर, रायगड, वरंध, विन्हेरे विभागात पावसाची संततधार सुरु असून पावसाचा जोर असाच कायम राहिला तर महाड बाजारपेठेसह नदीकाठी असणार्‍या गावांमध्ये पुराचे पाणी घुसण्याची शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0