तिघांना अटक, जामीनावर सुटका , गुन्ह्यातील इतर चौघांचा शोध सुरु

18 Aug 2025 20:36:37
karjat
 
कर्जत | येथील पत्रकार प्रथमेश कुडेकर हल्लाप्रकरणी कर्जत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. या हल्ल्याप्रकरणी १४ दिवसांनी पोलीस हल्लेखोरांपर्यंत पोहचले असून आणखी चौघांचा शोध कर्जत पोलीस घेत आहेत. पत्रकार प्रथमेश कुडेकर हल्लाप्रकरणी कर्जत येथे पोलीस उपअधिक्षक राहुल गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतली.
 
त्यावेळी कर्जत पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप भोसले यांच्या सह घटनेची माहिती दिली. १ ऑगस्ट रोजी पत्रकार प्रथमेश कुडेकर आणि त्यांचे सहकारी मयूर रणदिवे ह्यांच्यावर चार फाटा परिसरात काही अज्ञात इसमांनी प्राणघातक हल्ला केला होता. लोखंडी रॉड, फायटर आणि सापळा पद्धतीने केलेल्या ह्या हल्ल्यात पत्रकार प्रथमेश कुडेकर यांना गंभीर दुखापत झाली होती. राहुल गायकवाड यांनी माहिती देताना कर्जत पोलीस ठाणे येथील पोलिसांनी अधिक तपास करून काही तांत्रिक मुद्द्यांद्वारे घटनास्थळ परिसर खोपोली, खालापूर, चौक, नेरळ आणि द्रुतगती मार्गासह शेडुंग टोलनाका परिसरातील असंख्य सीसीटीव्ही तपासून या गुन्ह्यातील इसमानां निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आले.
 
या गुन्ह्यात आत्तापर्यंत कर्जत आणि महाड येथून एकूण तीन इसमांना अटक करण्यात आली. उर्वरित चौघांचा शोध पोलीस घेत आहे. अटक केलेल्या तिघांना न्यायालयाने १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती आणि १५ ऑगस्ट रोजी त्यांना जामीन मिळालेला आहे. इसमांनी गुन्ह्याकरिता वापरलेली एक मोटारसायकल आणि एक मारुती वॅगन कार जप्त करण्यात आली आहे.
 
या गुन्ह्याच्या तपासात कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे, पोलीस उप निरीक्षक सुशांत वरक, पोलीस हवालदार स्वप्नील येरुणकर, पोलीस हवालदार समीर भोईर, पोलिस नाईक प्रवीण भालेराव, पोलीस हवालदार सागर शेवते हे करीत आहेत. कर्जत तालुयातील या प्रकरणामुळे पत्रकार सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून पत्रकार प्रथमेश कुडेकर हल्ला हा एका पत्रकारावर झालेला हल्ला असून त्याबाबतचा गुन्हा कायद्यांतर्गत दाखल व्हावा, अशी मागणी केली. त्या मागणी चे निवेदन कर्जत तालुयातील पत्रकारांनी पोलीस उप अधिक्षक राहुल गायकवाड यांना सादर केले.
 
 
Powered By Sangraha 9.0