अलिबाग | तालुक्यात दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. अलिबाग शहरातील तिन्ही मोठ्या दहीहंड्या फोडण्याचा मान गोंधळपाडा गावदेवी पथकाने पटकावत हॅट्रीक साजरी केली. या पथकाने भाजप आयोजित दोन लाख २२ हजार, शेकाप आणि प्रशांत नाईक मित्रमंडळाची १ लाख ५० हजारांची तर जोगळेकर नाका येथील पिंट्या ठाकूर मित्रमंडळाची दहीहंडी लीलया आठ थर रचून फोडली आणि विजेतेपद पटकावले.
तर पेझारी येथील सवाई आणि सुमना पाटील यांनी आयोजित केलेली केलेल्या दहीहंडी स्पर्धेत मरुआई मेटपाडा पथकाने बाजी मारली. शेकाप पुरस्कृत आणि प्रशांत नाईक मित्रमंडळाच्या दहीहंडीचा सोहळा रंगतदार ठरला. शनिवारी दुपारपासून सुरु झालेल्या दहीहंडी सोहळ्याचा आनंद गोविंदा पथकांसह उपस्थितांनी व प्रेक्षकांनी मनमुरादपणे लुटला. या दहीहंडीचा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांची पाऊले दुपारी चार वाजल्यापासून शेकाप भवनसमोर पावले वळू लागली.
२० वर्षांची ही परंपरा पाहण्यासाठी हळूहळू शेकाप भवनसमोर गर्दी वाढत गेली. सायंकाळी ४ वाजताच सलामीचा थरार पाहण्याकडे वळू लागले. दरम्यान ढोलताशाच्या गजराने अलिबाग परिसर दुमदुमून निघाला. या गजरामधून त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवून दिले. भाजपने आयोजित केलेल्या दहीहंडी स्पर्धेला सायंकाळी सहा वाजता सुरुवात झाली.
या सोहळ्याचे उद्घाटन भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार पंडीत पाटील, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष चित्रा पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष खासदार धैर्यशिल पाटील, भाजपाचे रायगड जिल्हा सरचिटणीस अॅड. महेश मोहिते, भाजपा शहराध्यक्ष अॅड. अंकीत बंगेरा, रोशन भगत यांच्या उपस्थितीत झाले. त्यानंतर दहीहंडी सलामीला सुरुवात झाली. प्रारंभी संध्याकाळपर्यंत ५८ गोविंदा पथके आली होती. यामध्ये २४ महिला गोविंदा पथकांनी व ३४ पुरुष गोविंदा पथकांनी सलामी देऊन प्रत्येकी १५ हजार रुपयांची बक्षिसे जिंकली. तर मरूआई मेटपाडा गोविंदा पथकाला आठ थरांची सलामी दिल्याने २५ हजारांची रोख रक्कम देण्यात आली आहे.