अलिबाग | रायगड जिल्ह्यात रविवारी सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू होती. दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. रविवारी सायंकाळपर्यंत म्हसळा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. या पावसाने जनजीवन काहीसे विस्कळीत झाल्याचे पहायला मिळाले. काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली.
तर अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाल्याचे पहायला मिळत आहे. गुरुवारी संध्याकाळी जिल्ह्यात पावसाने बरसायला सुरुवात केली. स्वातंत्र्य दिन, दहीहंडी या दोन्ही उत्सवावर पावसाने बरसात केली. रविवारीही जिल्ह्याच्या सर्वच भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रस्त्यावर, सखल भागात पाणी साचले होते. अधूनमधून ५ - १० मिनिटांची विश्रांती घेत पाऊस दिवसभर कोसळत होता.
जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली तरी त्या इशारा पातळीच्या खालून वाहत होत्या. हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट दिला असल्याने प्रशासकीय यंत्रणादेखील सतर्क होती. मात्र कुठेही पूरस्थिती निर्माण झाली नाही, जीवित किंवा वित्त हानीचेही वृत्त नाही.
रविवारी दिवसभरात म्हसळा तालुक्यात सर्वाधिक १११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्या खालोखाल तळा तालुक्यात ६३ मिलिमीटर इतका पाऊस बरसला. सध्या बरसत असलेला पाऊस भातशेतीसाठी अतिशय पोषक असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. जिल्ह्यात दिवसभरात ३९.७१ च्या सरासरीने ६३५.४ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे.
तालुकानिहायपाऊस (मिमी) अलिबाग - २२, मुरूड -६०, पेण -५०, पनवेल - २०, उरण - ३२, कर्जत - १३, खालापूर - १७, माथेरान - २७.४, रोहा - २६, सुधागड - ३३, माणगाव - ४९, तळा - ६३, महाड - ३५, पोलादपूर - ५२, श्रीवर्धन - २५, म्हसळा - १११, एकूण ः ६३५.४ मि.मी. सरासरी - ३९.७१ मि.मी.