रायगडातही मतदार याद्यांमध्ये घोळ? खोपोलीत फक्त एका प्रभागात तब्बल १४० दुबार मतदार!

18 Aug 2025 13:25:25
ALIBAG
 
अलिबाग | देशात निवडणूक आयोगावर वोट चोरीचे आरोप होत असतानाच रायगडात आम आदमी पार्टींने सदोष मतदार याद्यांवर बोट ठेवले आहे. खोपोली शहरातील फक्त एका प्रभागाच्या मतदार याद्या तपासल्या असता, १४० मतदारांचे दोनवेळा नाव असल्याचे आम आदमी पार्टींचे प्रदेश संघटन सचिव डॉ. पठाण यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
 
तसेच केवळ एका प्रभागात जर १४० दुबार मतदार असतील तर जिल्ह्यात किती असतील? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. आम आदमी पार्टी खोपोली तर्फे कर्जत खालापूर १८९ विधानसभेतील खोपोली शहरातील शिळफाटा येथील प्रभाग क्रमांक दहा येथील मतदार याद्या तपासल्या. या प्रभागातील साडेचार ते पाच हजार मतदारांमध्ये तब्बल १४० मतदारांचे नाव यादीमध्ये दोन वेळा आलेले आहेत.
 
काही मतदार स्थलांतरित झालेले, काही मयत आहेत; परंतु अजूनही त्यांचे नाव यादीत दिसून येते. फक्त खोपोली शिळफाटा येथील यादीमध्ये जर इतक्या प्रमाणात घोळ असेल तर अख्ख्या विधानसभेमध्ये सात ते आठ हजार मतदार असे असतील ज्यांचे नाव दोन वेळा असेल अशी शंका आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव डॉ. पठाण त्यांनी उपस्थित केली आहे. दरम्यान, आम आदमी पार्टीतर्फे खालापूर तहसीलदार व निवडणूक आयोगाला पत्र देण्यात आले असून पुढील निवडणुकीकरिता याद्या अद्ययावत कराव्यात, अशी मागणी आम आदमी खोपोली शहर अध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांनी सांगितले.
 
 
Powered By Sangraha 9.0