मापगांव येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी उत्साहात साजरी

17 Aug 2025 19:20:01
 Alibag
 
सोगाव | अलिबाग तालुक्यातील मापगांव येथे गावातील बालगोविंदांसह सर्व स्तरातील मुले,मुली यांनी गावातील प्रत्येक आळी, वरचा पाडा, खालचा पाडा आदी ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने २५ पेक्षा जास्त दहीहंड्या फोडत उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
 
यावेळी श्रीकृष्ण भक्तांना व गोविंदा पथकांना कोणतीही अडचण व गैरसोय होऊ नये यासाठी ज्येष्ठांनी विशेष काळजी घेतली होती.'तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे,' गोविंदा आला रे आला' च्या सुरात इतर पारंपरिक गीते व संगीत वाद्यावर आलेल्या पावसाच्या सरीमध्ये भिजत लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सहभागी झालेले सर्व श्रीकृष्ण भक्तांनी व बालगोविंदांनी घरगुती बांधलेल्या लहान मोठ्या व कमी जास्त उंचीच्या दहीहंड्या मोठ्या प्रमाणात फोडून जल्लोषात उत्सव साजरा केला.
 
गोविंदा पथकांना दहीहंड्या फोडताना पाहण्यासाठी लहान बालगोपालांसह सर्व गटातील महिला व पुरुषांनी एकच गर्दी केली होती. या भागातील गावात काही ठिकाणी सकाळी तर काही ठिकाणी दुपारी दहीहंड्या फोडण्यात आल्या.
 
 
Powered By Sangraha 9.0