नवी मुंबई | आगामी जिल्हा परिषद, नगर पंचायत व महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वसमावेशक आढावा बैठक राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी कोंकण विभागात पार पडली.
मतदार यादी अद्ययावत करणे, मतदान केंद्रांचे नियोजन, कर्मचारी व सुरक्षा व्यवस्था, तसेच मतदार जनजागृतीसाठीच्या उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. बैठकीस राज्य निवडणूक अयोगाचे सचिव सुरेश काकाणी, कोकण आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, राज्य निवडणूक आयोगाचे विशेष कार्यकारी आधिकारी अं. गो. जाधव, ठाणे आयुक्त सौरभ राव, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, रायगडचे जिल्हाधिकारी रायगड किशन जावळे यांच्यासह कोकणातील अन्य जिल्हाधिकारी निवडणूक विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कोकण विभागांतर्गत मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या ७ जिल्हयांमध्ये एकूण ७५ विधानसभा मतदार संघ आहेत. ७ जिल्हयांतधील महसूल गावांची एकूण संख्या ६ हजार ५३० असून या गांवांमधील लोकसंख्या २ कोटी ८६ लाख १ हजार ४७१ आहे. कोकण विभागतील ५ जिल्हयांमध्ये ४५ पंचायत समित्या आहेत. यामध्ये ठाणे ५, पालघर ८, रायगड १५, रत्नागिरी ९ आणि सिंधुदूर्ग ८ अशा पंचायत समित्या आहे.
कोकण विभागातील ५ जिल्हयांमध्ये एकूण २७ नगरपरिषद, नगरपंचायत आहेत. त्यात ठाणे २, पालघर ४, रायगड १०, रत्नागिरी ०७ आणि सिंधुदूर्ग ४ अशा आहेत. कोकण विभागात बृहन्मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, भिवंडी निजामपूर, मिरा- भाईंदर, उल्हासनगर, पनवेल, नवी मुंबई अशा ९ महानगरपालिका आहेत.