मुंबई-गोवा महामार्गावरुन कोकणात परतणार्‍या... गणेशभक्तांच्या वाटेतील काटे होणार दूर

14 Aug 2025 18:16:59
mumbai
 
मुंबई | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या लाखो गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी आता उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे सरसावले असून, त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली देखरेख समिती नेमण्याचे निर्देश दिले आहेत. खड्ड्यांची तक्रार मिळताच २४ तासांत निराकारण करण्याचेही आदेश त्यांनी दिले आहेत.
 
मुंबई-गोवा महामार्गावरील गैरसोयी दूर करण्याबाबत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली, बुधवारी (१३ ऑगस्ट) मुंबई-सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. यावेळी मंत्रालयीन व क्षेत्रीय स्तरावरील सर्व संबधित अधिकारी आणि जनआक्रोश समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. २७ ऑगस्टपासून कोकणातील गणेशोत्सवाला सुरूवात होत असून लाखोंच्या संख्येने कोकणवासीय आपापल्या गावी जात असतात.
 
या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गाची डागडुजी करणे व वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची भूमिका खा. सुनील तटकरे यांनी मांडली. यावेळी जनआक्रोश समितीच्या पदाधिकार्‍यांनी खा. सुनील तटकरे यांच्या भूमिकेचे समर्थन केले. यावर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धोरणात्मक निर्णय घेत, ज्या-ज्या ठिकाणी बोगद्यांच्या अपूर्ण कामामुळे वाहतूकीचा खोळंबा होत आहे, अशा कोलाड ते माणगांव दरम्यानच्या सर्व बायपाससाठी २१ कोटी ९० लाख रूपयांचा निधी मंजूर करत ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
 
तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून ही सर्व कामे पूर्ण होईपर्यंत त्यावर देखरख करण्याची सूचना अजित पवार यांनी केली. महामार्गावर जिथे-जिथे खड्डे असतील त्याबाबत प्रवाशांच्या तक्रारी नोंदवून घेण्यासाठी हेल्पलाईन निर्माण करून तक्रार येताच क्षणी पुढील २४ तासात सकारात्मक कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे याही उपस्थित होत्या.
 
 
Powered By Sangraha 9.0