जेएसडब्ल्यूच्या फेज थ्रीविरोधात आज पेण येथे धरणे आंदोलन , पर्यावरण मूल्यांकन सारांशच्या प्रतींची होळी करणार

14 Aug 2025 20:01:57
 jsw
 
अलिबाग | जेएसडब्ल्यूच्या फेज थ्री या प्रकल्पाच्या विस्तारीकरणाला विरोध करण्यासाठी आज (१४ ऑगस्ट) पेण उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी पर्यावरण मूल्यांकन कार्यकारी सारांशच्या प्रतींची होळी करण्यात येणार आहे.
 
गुरुवारी १४ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता हे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती खारेपाट विकास संकल्प संघटना यांच्याकडून वितरीत करण्यात आली आहे. धरमतर जेट्टी येथील फेज थ्री विस्तार प्रकल्प फक्त ३२ ग्रामपंचायतींपुरता मर्यादित नाही तर, पेण आणि अलिबाग परिसरारवर प्रदूषणाच्या परिणाम करणारा आहे. खाडीतून मासेमारी करणार्‍या नागरीकांच्या उपजीविकेवर उठणार असल्याचे या संघटनेचे म्हटले आहे.
 
रासायनिक प्रदूषणामुळे खाड्या व खोर्‍यांचे पाणी दूषित झाले आहे. प्रचंड जहाजांच्या वाहतुकीमुळे बांधबंधिस्ती व किनारपट्टी असुरक्षित बनली आहे. शेती, मासेमारी, पूरक व्यवसाय, पिण्याचे व वापराचे पाणी आणि लोकांचे आरोग्यावर परिणाम होत आहे. अशात धरमतर येथील प्रकल्प आणखी विस्तारला तर प्रदूषणाची ही पातळी आणखी वाढेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
 
काही मागण्यादेखील या समितीने केल्या आहेत. यामध्ये, जनसुनावणी तटस्थ शासकीय ठिकाणी घ्यावी, सही-शिक्क्यासह अद्ययावत प्रदूषण अहवाल सार्वजनिक करावा, पर्यावरण मूल्यांकन कार्यकारी सारांश (मराठी/इंग्रजी) अधिकृत द्यावा, फेज-३ चे सर्व तांत्रिक तपशील व परिणाम जनतेसमोर मांडावेत, ग्रामपंचायतींना अधिकृत अहवाल द्यावा, अन्यथा जनसुनावणी स्थगित करावी, अशी मागणी केली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0