मंत्रीपद सोडले, पालकमंत्रीपद किस बात की...?

14 Aug 2025 19:30:10
 mangoa
 
माणगाव | अहो, आमच्या नेत्यांसाठी आम्ही अडिच वर्षांचे मंत्रीपद सोडले होते, पालकमंत्री किस झाड की पत्ती? असा प्रती प्रश्न मंत्री भरत गोगावले यांनी पत्रकारांसमोर केला. रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वाद आहे. माणगाव येथे शिवसेनेचा महाविजय निर्धार मेळावा संपन्न झाला.
 
यानंतर पत्रकारांनी मंत्री भरत गोगावले यांनी छेडले असता, ज्या मावळ्यांनी अडीच वर्षासाठी मंत्रिपद सोडले, त्याला पालकमंत्री किस बात की चीज है असे वक्तव्य केले आहे. सत्तेतील दोन पक्षांच्या भांडणामुळे रायगड जिल्हा पालकमंत्र्याशिवाय राहिला आहे. २६ जानेवारी, १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करण्याचा मान पुन्हा एकदा मंत्री अदिती तटकरे यांना मिळत असतो. त्यामुळे यावेळी ध्वजारोहणाचा मान तरी गोगावले यांना मिळावा, अशी इच्छा उदय सामंत आणि कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली होती.
 
मात्र शासनाने परिपत्रक जारी केल्यानंतर अदिती तटकरे यांनाच पुन्हा ध्वजारोहणाची संधी असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पालकमंत्रिपद सोडण्याने इतिहासात माझे नाव कोरले गेले आहे. मात्र, बाबा मुख्यमंत्री आणि मीसुद्धा मंत्री व्हायला पाहिजे, असे एकनाथ शिंदे यांनी केले नाही असा टोलाही त्यांनी मारला आहे. दरम्यान, अदिती तटकरेंचे नाव जरी झेंडा वंदनासाठी जाहीर झाले असले तरी भरतशेठच रायगडचे पालकमंत्री असणार आहेत, असा विश्वास कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केला आहे. पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री यांना पूर्ण कल्पना आहे, ते योग्य तो निर्णय घेतील, असेही त्यांनी म्हटले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0