गोरेगाव लाखपाले येथे अपघात; डॉक्टर महिलेचा मृत्यू

14 Aug 2025 19:35:30
 lonare
 
लोणेरे | मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लाखपाले येथे वॅगनार कारने, कंटेनरला पाठीमागून धडक दिली. या अपघातात कारमधील एका महिला डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. डॉ. प्रियंका भास्कर आहेर (वय ३२) असे त्यांचे नाव आहे. मंगळवारी (१२ ऑगस्ट) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
 
मूळच्या बीड जिल्ह्याच्या रहिवासी असलेल्या डॉ. प्रियंका सध्या पुणे येथे राहत होत्या. त्या डॉ. विशाल रमेश बडे (अनपटवाडी पारगाव ता. पाटोदा जि.बीड, सध्या रा. पुणे) यांच्यासोबत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरुन पुण्याला जात होत्या. तर राहुल रामचंद्र यादव (वय २४) हा चालक कंटेनर घेऊन महाड येथून मुंबईच्या दिशेने निघाला होता. यादव हा कंटेनर एका लेनवरुन दुसर्‍या लेनवर वेड्यावाकड्या पध्दतीने चालवत होता.
 
तो माणगाव तालुक्यातील लाखपाले येथील एचपी पेट्रोल पंपासमोर वॅगनार कारचालक डॉ. विशाल बडे यांनी धडक दिली.ही धडक इतकी जबर होती की कारचा समोरचा भाग पूर्णपणे कंटेनरच्या पाठीमागील चॅसीच्या खाली जाऊन फसला. या अपघातात डॉ. प्रियंका यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक डॉ. विशाल बडे जखमी झाले आहेत.
 
या अपघाताची माहिती टेमपाले येथील समीर अब्दुलवहाब मुरुडकर यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे यांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने मृत डॉ. प्रियंका आणि जखमी डॉ. विशाल यांना रुग्णालयात हलविण्यास मदत केली. गोरेगाव पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उप निरीक्षक एस. एन. रासकर करीत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0