जिल्ह्यात १ लाख २ हजार ४८४ गणपती बाप्पा विराजमान होणार , गणेशोत्सवासाठी जिल्हा प्रशासन सज्ज!

13 Aug 2025 18:38:35
 alibag
 
अलिबाग | महाराष्ट्राचा महासण, गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांव येऊन ठेपला आहे. यंदा रायगड जिल्ह्यात १ लाख २ हजार १९८ खासगी तर २८६ सार्वजनिक मंडळाचे गणपती विराजमान होणार आहेत. या सणासाठी लाखो कोकणवासी आपापल्या गावाकडे परतत असतात.
 
त्यामुळे कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांना दिंडीसारखे स्टेटस द्या, असे आवाहन रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी जावळे यांनी मंगळवारी (१२ ऑगस्ट) जिल्हास्तरीय शांतता कमिटीची बैठक आयोजित केली होती. यावेळी पोलीस अधीक्षक आंचल दलाल, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निशिकांत पाटील आदी उपस्थित होते.
 
यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे म्हणाले की, महसूल, पोलीस, नगरपालिका, ग्रामपंचायत यासह विविध शासकीय विभागांनी गणेशोत्सव आनंदात व सुव्यवस्थित होण्यासाठी उपाययोजना व नियोजन पूर्ण केले आहे. जिल्ह्यात गणेशोत्सवाचे पूर्वतयारी जोरात सुरु असताना प्रशासन देखील गणेशोत्सवाच्या काळात कायदा सुव्यवस्था सुव्यवस्थित राखणे, गणेश भक्तांना योग्य ती सुविधा प्राप्त करणे, कोकणामध्ये खास गणवेशोत्सवासाठी परतणार्‍या चाकरमान्यांसाठी प्रवास सुखकर होईल, या दृष्टीने उपाययोजना करणे या दृष्टीने सतर्क झाले आहे.
 
alibag
 
गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीकोनातून पेट्रोलिंग, फिक्स पॉईंट, सुविधा केंद्र, क्रेन, अ‍ॅम्ब्युलन्स व होमगार्ड नेमण्यात आले आहेत.मुंबई-गोवा महामार्गावर सुविधा केंद्रावर पोलीस मदत केंद्र, आपत्कालीन पोलीस मदत टोईंग व्हॅन, क्रेन, वाहन दुरुस्ती कक्ष, आपत्कालीन वाहन दुरुस्ती व टायरमध्ये हवा भरण्याची सुविधा असेल. वैद्यकीय कक्ष, अ‍ॅम्ब्युलन्स सेवा, मोफत आपत्कालीन वैद्यकिय उपचार सुविधा, बालक आहार कक्ष व मोफत चहा, बिस्कीट, सरबत, पाणी, ओ.आर.एस. आणि महिलांसाठी फिडींग कक्ष उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
 
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर अवजड वाहनांना बंदीच्या दृष्टीने दिनांकनिहाय आदेश देण्यात आले आहेत. १६ टन व त्यापेक्षा अधिक वजन आहे अशा वाहनांना हे बंदी आदेश लागू राहतील. यानुसार २३ ऑगस्ट सायंकाळी सहा वाजल्यापासून ते २९ ऑगस्ट रात्री बारा वाजेपर्यंत तसेच २ सप्टेंबर सकाळी ८ वाजल्यापासून ते ४ सप्टेंबर रात्री ८ वाजेपर्यंत तसेच ६ सप्टेंबर सकाळी ८ वाजल्यापासून ते ८ सप्टेंबर रात्री ८ वाजेपर्यंत आदेश अंमलात राहणार आहेत. या गणेशोत्सवाची सांगता दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस अशा विविध दिवशी तसेच दहा दिवसाचे ६ सप्टेंबर रोजी आणि २१ दिवसांचे गणपती २७ सप्टेंबर रोजी यानुसार विसर्जनाच्या दिवशी होईल.
 
यासाठी सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. यातील समुद्रावर ५२ गणेशमूर्ती विसर्जन, खाडीमध्ये १०५ गणेशमूर्ती विसर्जन, नदीमध्ये २४४ गणेशमूर्ती विसर्जन, तलावामध्ये १०० गणेशमूर्ती विसर्जन व इतर ठिकाणी ९४ गणेशमूर्ती विसर्जन होणार आहे. या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्था व शासनाकडून सुविधा नियोजन व उपाययोजना करण्यात येत आहे.
 
मुस्लीम बांधवाचा ईद-ए-मिलाद हा सण ५ सप्टेंबर रोजी साजरा होत आहे. जिल्ह्यात नमाज पठणाचा कार्यक्रम होणार असून विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यात येणार आहेत. त्याकरीता पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्वतंत्र बंदोबस्त लावण्यात येणार आहे. गणपती उत्सवादरम्यान जिल्ह्यात पोलीस, होमगार्ड, एसआरपीएफ, अधिकारी कर्मचारी बंदोबस्त लावण्यात येणार आहे.
 
या कालावधीत दहशतवादी कारवाई रोखण्यासाठी एटीबी व एटीसी चे पथक नेमण्यात आले असून सोशल मिडीया देखरेख करण्याकरीता सायबर सेल सतर्क आहे. प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. शांतता कमिटी बैठका मोहल्ला कमिटी बैठका घेतल्या आहेत. मंडळ बैठका, गावभेटी, दंगाकाबू पथकाने रंगीत तालीम, रुट मार्च करण्यात येत आहेत. या बैठकीला विविध शासकीय विभागांचे अधिकारी तसेच रायगड जिल्हा शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
 
 
Powered By Sangraha 9.0