अलिबाग | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजयाची हंडी आम्हीच फोडणार, असा विश्वास शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी केला आहे. माजी सभापती दिलीप भोईर सोबत आल्याने अलिबाग मतदासंघातील सर्वच जागा आम्ही जिंकू, असेही त्यांनी म्हटले आहे.
दिलीप भोईर यांनी विधानसभा निवडणूकीत आपली ताकद दाखवून दिली आहे. आता ते शिवसेनेसोबत आल्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले असून आता आरोप करण्याशिवाय त्यांच्याकडे कोणतेही काम उरलेले नाही, असा टोलाही आमदार दळवी यांनी लगावला आहे. रायगड जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेना नेहमीच अग्रेसर राहिली आहे. दिलीप भोईर आणि त्यांचे समर्थक आल्यामुळे आमची ताकद दुप्पट झाली आहे.
शिवसेना एकजूट झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लोकांसमोर जाणार आहोत आणि आम्हाला जनतेचा पाठिंबा नक्कीच मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विरोधकांकडे कोणतेही ठोस मुद्दे नाहीत. लोकांच्या हितासाठी काहीही न करता ते केवळ शिवसेनेवर खोटे आरोप करत आहेत. पण जनता सुज्ञ आहे आणि त्यांना सत्य काय आहे, हे माहिती आहे. त्यामुळे त्यांचे खोटे आरोप हवेत विरून जातील, असेही दळवी यांनी सांगितले. शिवसेनेच्या या नव्या युतीमुळे आगामी निवडणुकीत विरोधकांना कडवे आव्हान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.