कर्जत येथे ड्रग्जचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त? डी फार्मसी झालेल्या सुशिक्षीत तरुणांचे नको ते उद्योग!

12 Aug 2025 16:33:48
 KARJAT
 
कर्जत | तालुक्यातील ताडवाडी येथील बंद असलेल्या घरात ड्रग्जसदृश्य कारखान्याचा नेरळ पोलिसांनी पर्दाफाश केला. घरात नव्याने आलेल्या भाडेकरूंकडून काहीतरी चुकीचे चालले आहे, असे दिसून आले. त्यानंतर ग्रामस्थांनी मध्यरात्री नंतर या कारखाना उद्ध्वस्त केला.
 
नेरळ पोलीस ठाण्यात या ड्रग्ससदृश्य पदार्थांच्या कारखान्याबद्दल गुन्हा दाखल झाला असून पाचजण अटकेत आहेत. पाथरज ग्रामपंचायतीमधील ताडवाडी कुरुंग रस्त्यावर ताडवाडीमधील एका आदिवासी व्यक्तीचे घर आहे. ते घर मुंबई धारावी येथील काही लोकांनी भाड्याने घेतले. या ठिकाणी १० ऑगस्टच्या मध्यरात्री सदर तरुण एक मारुती ब्रिझा कार घेऊन आल्याचे ग्रामस्थांनी पाहिले.
 
भाडेकरूंचे कोणी ओळखीचे असतील असे सर्वांना वाटले होते. परंतु रात्री संपूर्ण गाव झोपी गेल्यानंतर त्या घरामध्ये काही हालचाली ताडवाडी ग्रामस्थांनी पाहिल्या. त्यामुळे सर्व ग्रामस्थ मध्यरात्री दोन वाजता वाडीमध्ये जमा झाले आणि सर्वांनी माळरानावरील घराकडे जाण्याचा निर्णय घेतला. घरामध्ये यावेळी पाच तरुण वेगवगेळ्या लोखंडी डब्यांमध्ये काही तरी द्रव्य वस्तू मिसळत असल्याचे दिसून आले.
 
KARJAT
 
सर्व साहित्याला उग्र वास येत असल्याने ग्रामस्थांनी त्यांनी हटकले.मात्र भाडेकरु असलेल्या त्या व्यक्तींनी ग्रामस्थांवर अरेरावी करण्यास सुरुवात केली. ग्रामस्थांनी एकजूट दाखवत त्यासर्व पाच जणांना पकडले आणि बेदम मारहाण केली. तसेच त्यांना बांधून ठेवत पोलिसांना खबर केली. मध्यरात्री तीन वाजता कळंब येथून दोन पोलीस कर्मचारी येथे पोहचले, त्यांनी जागेवरची संशयित हालचाल पाहून त्यांनी नेरळ पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांना संपर्क केला.
 
ढवळे यांना बर्फाच्या लाद्या आणि रसायने पाहून हा ड्रग्ज बनविण्याचा प्रकार असल्याचे लक्ष आले. त्यांनी पाचही जणांना नेरळ पोलीस ठाणे येथे नेले. साहित्याचा पंचनामा करून पोलीस पहाटे नेरळ येथे पोहचले. सोमवारी (११ ऑगस्ट) सकाळी नेरळ पोलिसांनी त्या ठिकाणी पुन्हा जाऊन नशिले पदार्थ बनविण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला. रायगड पोलिसांची टीम नेरळ येथे पोहचली असून नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पाच जणांमध्ये एक तरुण डी. फार्मसीपर्यंत शिक्षण घेतलेला तरुण आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0