रायगड जिल्ह्याच्या मुख्यालयात , अदिती तटकरेंच्या हस्ते ध्वजारोहण

12 Aug 2025 12:46:25
MUMBAI
 
मुंबई | १५ ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनी रायगड जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे याच ध्वजारोहण करणार असल्याचे जाहीर झाले आहे. तसे एक परिपत्रक राज्य सरकारने काढले आहे. त्यामुळे पालकमंत्रीपद राहिले दूर, मंत्री भरत गोगावले यांची ध्वजारोहण करण्याची इच्छाही अपुरीच राहणार आहे.
 
रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यामधील वाद संपायचे नाव घेत नाही. भरत गोगावले आणि अदिती तटकरे या दोघांनीही हक्क सांगितल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालमंत्रिपदाला स्थगिती दिली आहे. पद स्थगित असले तरी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी यापूर्वी ध्वजारोहण अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. जिल्ह्यातील महाडचे आमदार भरत गोगावले यांच्याकडेही मंत्रीपद आहे.
 
येत्या स्वातंत्र्य दिनी ही संधी मंत्री भरत गोगावले यांना मिळावी, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांसह जिल्ह्यातील आमदारांकडून करण्यात येत होती. त्यामुळे स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण कोण करणार? असा प्रश्न उभा ठाकला होता. मात्र राज्य शासनाने परिपत्रक काढून अदिती तटकरे याच ध्वजारोहण करणार असल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयाने स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहणाचा मान मिळेल, अशी आशा लावून बसलेल्या मंत्री भरत गोगावले यांना धक्का बसला आहे.
 
तसेच भरतशेठ यांनीच पालकमंत्री होऊन ध्वजारोहण करावे, अशी इच्छा शिवसेनेतील अनेक नेते, मंत्री बोलून दाखवत होते. त्यांचीही इच्छा राज्य सरकारच्या परिपत्रकाने धुळीला मिळाली आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन नुकतीच एकनाथ शिंदे आणि सुनील तटकरे यांची दिल्लीत बैठक झाली होती. दोन्ही नेत्यांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. परंतु पालकमंत्रिपदावरील हक्क सोडण्यास तटकरे यांनी नकार दिला. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रिपदावर तोडगा निघू शकलेला नाही.
 
Powered By Sangraha 9.0