माणगाव येथील बहुपयोगी कालव्याची दुर्दशा , लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; नागरिकांमधून तीव्र संताप

01 Aug 2025 20:23:32
 mangoan
 
उतेखोल/माणगाव | माणगाव तालुयातील काळ प्रकल्प कालवा हा तालुयातील शेतीच्या दृष्टीने वरदान ठरलेला असूनही आजही तो दुर्लक्षिततेच्या विळख्यात सापडला आहे. दरवर्षी डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात सुरु होणारा हा कालवा तालुयातील भातशेती, भाजीपाला, फळबागा, औषधी वनस्पती आणि जलस्रोतांसाठी जीवनदायिनी भूमिका बजावत असतो.
 
मात्र, या कालव्याच्या देखभालीकडे स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नगरपंचायतीचे दुर्लक्ष प्रकर्षाने जाणवते आहे. एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणार्‍या रायगड जिल्ह्यात उन्हाळी शेती टिकवून ठेवणारा हा कालवा आज विलोपनाच्या उंबरठ्यावर आहे. सध्या या कालव्याची अवस्था ‘राम तेरी गंगा मैली हो गयी’ या गीतासारखी झाली असून, तो प्रदूषित होत चालला आहे.
 
संपूर्ण शहरातून वाहणारा हा कालवा केवळ शेतीसाठीच नव्हे, तर माणगावच्या सौंदर्यातही भर घालणारा आहे. शहराचे तापमान कमी करणे, पर्यावरणास पोषक असणे, पाण्याचा निचरा सुकर करणे, अशा अनेक भूमिका तो पार पाडतो. प्रशासनाचे बोट आणि राजकीय दुर्लक्ष कालव्याची देखभाल, दुरुस्ती, मजबुतीकरण, साफसफाई या बाबींकडे कोणीच लक्ष देत नाही. नगरपंचायतीकडे तक्रार केली असता ते जलसंपदा विभागाकडे बोट दाखवतात.
 
प्रत्यक्षात हा विषय स्थानिक आमदारांनी आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन मार्गी लावण्याचा आहे. २५ जानेवारी २०२१ रोजी तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माणगाव जलसंपदा कार्यालयाच्या लोकार्पणप्रसंगी काळनदीवरील बंधार्‍याच्या पूर्ततेसाठी आणि कालव्याचे मजबुतीकरण तसेच काही भागात त्याचे बंद पाईपलाईन किंवा बंदीस्त स्वरूपात रूपांतर करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, ही बाब जनतेच्या मनात संशय निर्माण करते.
बारामतीचा आदर्श, माणगावचा विसर?
बारामती येथील नीरा डावा कालव्यातील कामे प्रगतीपथावर असून, स्थानिक नेत्यांनी त्याला शहर सौंदर्यीकरणाशी जोडले आहे. मात्र माणगावसारख्या महत्वाच्या तालुयातील कालवा याबाबतीत केवळ चर्चा आणि ओशासनांपुरताच मर्यादित राहिला आहे. बारामतीचा आदर्श आपण माणगावात का राबवत नाही? हा प्रश्न सामान्य शेतकर्‍यांपासून ते जागरूक नागरिकांपर्यंत सर्वत्र उपस्थित केला जात आहे.
सीएसआर निधी; पण कालव्यासाठी नाही?
अलीकडेच माणगाव शहरासाठी गेल कंपनीच्या सीएसआर निधीतून २.५ कोटी रुपयांची कामे करण्यात आली. १४४ पथदिवे व २० हायमास्ट दिव्यांचे उद्घाटन खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी ज्येष्ठ पत्रकारांनी कालव्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला असता, खासदारांनी लक्ष घालतो असे उत्तर दिले. मात्र प्रत्यक्षात कृतीची प्रतीक्षा आहे.
 
दखल घ्या, अन्यथा गंभीर परिणाम कालव्यात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकणे, यंत्राच्या सहाय्याने अर्धवट स्वच्छता, देखरेखीचा अभाव आणि राजकीय हस्तक्षेप यामुळे या कालव्याचे अस्तित्व धोयात आले आहे. पाचशे मीटर कालवा काँक्रीट करून वार्षिक गळतीची समस्या दूर करता येऊ शकते, असे तज्ञांचे मत आहे.
जनतेची मागणी
शहर आणि शेती दोन्हींसाठी महत्वाचा असलेल्या या कालव्याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर भविष्यात संभाव्य दुष्काळजन्य परिस्थितीला आपणच जबाबदार ठरणार आहोत. त्यामुळे शासन, प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने योग्य पावले उचलावीत, अशी तीव्र मागणी माणगावच्या शेतकरी आणि नागरिक वर्गाकडून होत आहे.
Powered By Sangraha 9.0