रायगड पोलीस रॉक्स, सायबर चोरटे शॉक ; जिल्ह्यातील डिजिटल अरेस्ट गुन्ह्याची पाळेमुळेच उखडली

01 Aug 2025 14:02:03
alibag
 
अलिबाग | ‘डिजिटल अरेस्ट’ नावाचा पहिलाच गुन्हा रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये घडला. सायबर चोरट्यांनी एका वृध्द नागरिकाला ६६ लाख रुपयांचा चुना लावला होता. मात्र दीड महिन्यांच्या अथक प्रयत्नाने, या चोरीतील म्होरक्यासह अकरा जणांच्या मुसक्या आवळण्याचा भीम पराक्रम रायगडच्या सायबर सेलने केला आहे.
 
चोरट्यांकडून विविध बनावट कंपन्यांच्या नावावर घेतलेले दीड किलो वजनाचे ६ हजार १७५ सिमकार्ड्स, ३५ मोबाईल फोन, लॅपटॉप जप्त केले आहेत. रायगड पोलिसांची ही सर्वांत रॉकींग कारवाई असून हायटेक टेक्नॉलॉजीचा वापर करुन लूटमार करणारे सायबर चोरटेही शॉकमध्ये आहेत. धक्कादायक म्हणजे सायबर चोरीमध्ये जिओ कंपनीच्या दोन अधिकार्‍यांचाही समावेश असल्याची माहिती पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांनी दिली आहे.
 
२३ मे २०२५ रोजी अलिबाग तालुक्यातील एका वृध्दाने याबाबतची तक्रार रायगड सायबर सेलकडे केली होती. या वृध्द नागरिकाला ५ मे रोजी, सीबीआयमधून बोलत असल्याचे भासवून ‘मनीलाँड्रींग’प्रकरणी तुमच्या विरोधात सुप्रीम कोर्टाचे अटक वॉरंट निघाले आहे, असे भासविण्यात आले. जर यातून सुटायचे असेल तर पैसे भरावे लागतील, असे सांगण्यात आले. घाबरलेल्या तक्रारदाराने पैशांची जमवाजमव करुन एकदा ३२ लाख, दुसर्‍यावेळी ३४ लाख असे ६६ लाख रुपये या सायबर चोरट्यांनी सांगितलेल्या बँकांमध्ये भरले.
 
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या वृद्धाने याप्रकरणी रायगड पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार केली होती. सायबर चोरट्यांकडून फसवणूक म्हणजे पैसे गेल्यातच जमा असे समजले जाते, मात्र पोलीस निरीक्षक रजवान नदाफ आणि उपनिरीक्षक अमोल जाधव आणि त्यांची टिम चिवट निघाली. पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांचे मार्गदर्शन घेऊन सर्व कामाला लागले. एका सायबर एक्सपर्टचीही मदत घेण्यात आली. शोध घेत असताना एक एक धागा जुळत गेला.
 
चौकशीदरम्यान तक्रारदाराचे पैसे ए.एच. अ‍ॅग्रो वूड इंडस्ट्रीच्या सेंट्रल बँक अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आल्याचे दिसत होते. त्यावरुन पोलिसांनी कंपनीचा संचालक अब्दुस सलाम बारभुयान याला १४ जून रोजी अटक केली. पहिला संशयित क्रमांक "निवी क्लावूड” कंपनीच्या नावाने नोंदणीकृत होता. भोकरपाडा पनवेल येथे कार्यरत असलेल्या योटा डेटा सेंटर हे विविध कंपन्यांसाठी डेटा सर्व्हर होस्ट करते. एक काल्पनिक व्यक्ती विनीत दुवा कंपनी, निवी क्लाऊड प्रायव्हेट लिमिटेडचा संचालक आहे.
 
त्यांच्याकडून शाहगंज जौनपूर येथील, नदीम अहमद, लारैब खान, शादान खान आणि मोहम्मद फैसल खान यांची माहिती पोलिसांना मिळाली हे चारजण जिओचे सेल्स एक्झिक्युटीव्ह विनय कुमार राव आणि गंगाधर मुट्टन यांच्याशी संगनमत करून बनावट केवायसी कागदपत्रे बनवून विविध कंपन्यांच्या नावावर एसआयपी लाईन्स मिळवायचे. जिओचे अधिकारी नंतर ही कागदपत्रे छापायचे आणि या कंपन्यांचे बनावट सील आणि शिक्के बनवून कनेक्शन सुरू करायचे.
 
तर बिलाल फैजान अहमद याने आपल्या नावाचे सिम लारैब याला वापरण्यास दिले होते. या सायबर गुन्ह्यांचा सूत्रधार आदित्य उर्फ अभय मिश्रा बी-टेक असून त्याचे शिक्षण कॉम्प्युटर सायन्समधून झाले आहे. मिश्रा हा या पूर्ण सायबर रॅकेटचा संचलन करण्याचे काम करत होता. तो भारतीय नागरिकांची फसवणूक करण्यासाठी पाकिस्तान, कॅनडा, नेपाळ, चीन आणि बांगलादेश येथील काही लोकांशी संपर्कात होता.
 
अभय मिश्रा याला पोलिसांनी उतरप्रदेश, हरदोई येथील त्याच्या घरातून अटक केली. त्याचे साथीदार शम्स ताहीर खान याला झुनझूनवाला राजस्थान येथून अटक करण्यात आली. तो एसआयपी लाइन्ससाठी मार्केटींग करण्याचे काम करत होता. यानंतर मोहसिन मिया खान याला दिल्ली येथून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक किलोपेक्षा जास्त बनावट सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत.
 
यामध्ये जिओ सिम १ हजार ७०९, एअरटेल-२ हजार ३३४, व्हीआय ७९०, आयडीया, ४३५, बीएसएनएल २२४, वोडाफोन-५९७, टाटा डोकोमो-२५, युनिनॉर-१२, एअरसेल-२५ असा समावेश आहे. रायगड सायबर सेलचे सहाय्यक फौजदार अजय मोहिते, पोलीस हवालदार राजीव झिंजुर्टे, पोलीस नाईक तुषार पाटील, पोलीस नाईक राहुल पाटील, पोलीस शिपाई श्रेयश गुरव, पोलीस हवालदार सुचिता पाटील, पोलीस शिपाई पुजा पाटील या पथकाने ही कामगिरी पार पाडली.
सूत्रधार मिश्राची पॉपर्टी
आदित्य उर्फ अभय मिश्रा हा अ‍ॅलेक्स हे नाव वापरून ११ परदेशातील व्यक्तींबरोबर चॅटींग व कॉलिंग करीत होता. तो नेपाळ येथे कायमस्वरूपी वास्तव्याकरीता बनावट कागदपत्रे तयार करण्याच्या तयारीत होता.
 
त्याच्याकडे नोयडा येथे १ फ्लॅट, हरदोई येथे २ दुकान गाळे तसेच बीट कॉईन, अकाऊंटमध्ये भारतीय चलनमधील ८५ लाख रूपये असून त्याचे आई व भाऊ यांच्यादेखील नावाने नावे संपत्ती घेतलेली आहे.
 
Powered By Sangraha 9.0