पेण | महावितरणच्या उच्चदाबाच्या वीज वाहिन्या एका जागेवरुन दुसर्या जागेवर स्थलांतरित करण्यासाठी कामाचा तांत्रिक परवाना देण्यासाठी पाच हजारांची लाच स्वीकारताना महावितरणच्या पेण मंडळ कार्यालयातील उपअभियंता संजय प्रदीप जाधव याला नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
मंगळवारी (८ जुलै) दुपारी साडेतीन वाजता सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. खालापूरातील एका इसमाच्या जागेतून महावितरणच्या उच्चदाबाच्या ३ वाहिन्या गेल्या आहेत. या वाहिन्या एका जागेवरुन दुसर्या जागेत स्थलांतरीत करण्यासाठी या व्यक्तीने तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे असलेल्या शाक्य एंटरप्रायजेस या कंपनीला काम दिले होते. या कामाकरिता आवश्यक असलेला तांत्रिक परवाना महावितरणच्या पेण मंडळ कार्यालयात प्रलंबित होता.
हा तांत्रिक परवाना लवकरात लवकर मिळावा, याकरिता जागा मालकाच्यावतीने तक्रारदाराने अर्ज केला होता. हा परवाना देण्यासाठी उपअभियंता संजय जाधव (वय ५३) याने पाच हजारांची मागणी केली होती. यासंदर्भात नवी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार पडताळणी करुन, मंगळवारी दुपारी कार्यालयात सापळा रचण्यात आला. यावेळी उपअभियंता संजय जाधव याला ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याविरोधात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.