पनवेल | एटीएममध्ये पैसे भरणार्या कळंबोली येथील हिताची कॅश मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील एटीएम ऑपरेटरने १ कोटी ९० लाखांचा अपहार केला आहे. धनराज जितेंद्र भोईर असे या एटीएम ऑपरेटरचे नाव असून कळंबोली पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
धनराज भोईर हा कळंबोलीतील हिताची कॅश मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीत एटीएम ऑपरेटर म्हणून कार्यरत होता. धनराजकडे कामोठे, कळंबोली आणि खारघर परिसरातील वेगवेगळ्या बँकांच्या एटीएम मशिनमध्ये पैसे भरण्याची जबाबदारी होती. त्यानुसार तो एटीएम मशिनमध्ये पैसे भरण्यासाठी जात होता; मात्र सर्व रक्कम मशिनमध्ये न भरता, त्यातील काही तो काढून घेत होता.
अशा पद्धतीने धनराजने २६ फेब्रुवारी ते ३० जून या चार महिन्यांदरम्यान १ कोटी ९० लाख ४९ हजार ६० रुपयांची रक्कम चोरली. वेगवेगळ्या बँकांकडून एटीएमची रक्कम हिताची कंपनीकडे येत असल्याने या रकमेत तफावत आढळल्याने कंपनीने गत सहा महिन्यांच्या व्यवहाराची तपासणी केली. या तपासणीत कामोठे, कळंबोली आणि खारघर या परिसरातील एटीएम मशीनमधील रक्कम कमी असल्याचे आढळून आले.
या भागातील सर्व एटीएम मशीन धनराज सांभाळत असल्याने त्यानेच या रकमेचा अपहार केल्याचे कंपनीच्या लक्षात आले. त्यानंतर कंपनीच्या अधिकार्यांनी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार कळंबोली पोलिसांनी तांत्रिक पुरावे व तपासाच्या आधारे आरोपी धनराजला अटक केली. आरोपीने अपहार केलेली रक्कम कुठे वापरली आहे, याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.