माणगाव | शेतीसाठी नांगरायला नेत असताना, तिलोरे गावातील एका शेतकर्याच्या दोन बैलांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. शेतीच्या हंगामातच झालेल्या या आघातामुळे शेतकर्यावर मोठे संकट ओढवले आहे. रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी २५ हजार रुपयांची तात्काळ मदत करुन या शेतकर्याला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.
तिलोरे गावचे शेतकरी संजय बबन बेंदुगडे हे त्यांचे दोन बैल घेऊन शेतामध्ये नांगरणीसाठी जात होते. यावेळी खांबावरुन जाणारी विद्युत वाहिनी तुटून रस्त्यावर पडली होती. पडलेल्या या वीज वाहिनीचा धक्का या दोन बैलांना लागला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री ना. भरत गोगावले यांना समजतात, त्यांनी संकटग्रस्त शेतकरी संजय बेंदुगडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.
तसेच संबंधित अधिकार्यांना शेतकरी कुटुंबाला भरपाई मिळवून देण्याच्या सूचना दिल्या. इतकेच नाही तर त्या शेतकर्याला तात्काळ २५ हजार रुपयांची आर्थिक मदत करुन मदतीचा हात पुढे केला. यावेळी त्यांच्यासोबत युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे, उपजिल्हाप्रमुख रमेश मोरे, तालुकाप्रमुख महेंद्र मानकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे, विभागप्रमुख योगेश बक्कम, खरवली सरपंच संतोष खडतर, शाखाप्रमुख शैलेश जंगम, युवासेना विभागप्रमुख सुरज सांगले, आप्पा सांगले, अमित ढाकवळ, अनिल बेंदुगडे व तिलोरे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.