रायगडात जिओ टॅगिंग विरोधात ठेकेदारांची निदर्शने

05 Jul 2025 12:52:30
 alibag
 
अलिबाग | रायगड जिल्हा परिषदेच्या जिओ टॅगिंगला जिल्ह्यातील ठेकेदारांनी विरोध केला आहे. ग्रामीण भागात अजूनही नीट इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे गैरसोयीची आणि त्रासदायक ठरणारी जिओ टॅगिंग प्रणाली रद्द करावी, अशा मागणीचे निवेदन ठेकेदार संघटनेने जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांना दिले आहे.
 
शुक्रवारी (४ जुलै) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अलिबाग येथील जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर या ठेकेदारांनी निदर्शने केली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राज्य सरकारकडून फक्त तीन जिल्ह्यांकरीता जिओ टॅगचा जी.आर. काढण्यात आला आहे. यामध्ये रायगड जिल्हा परिषदेचाही समावेश आहे. या नवीन परिपत्रकामुळे ठेकेदारांना बिल तयार करताना या प्रणालीचा त्रास होत असल्याचे यापूर्वीदेखील आम्ही कळवले होते.
 
परंतू आजतागायत उत्तर मिळालेले नाही, असे या ठेकेदारांनी म्हटले आहे. रायगड जिल्हा हा दुर्गम भागामध्ये असल्यामुळे जिओ टॅगिंग या प्रणालीला पुढील काही महिन्यांकरिता स्थगिती देऊन ठेकेदारांना बिले अदा करावी, असे स्मरणपत्र यावेळी देण्यात आले. हे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावतीने मुख्य वित्त अधिकारी यांनी स्वीकारले.
 
 
Powered By Sangraha 9.0