एसटी थांब्यावर अतिक्रमण...ग्रामपंचायत उदासीन , कडाव येथे पत्रकारांचे १५ जुलैपासून उपोषण

04 Jul 2025 18:32:33
KARJT
 
कर्जत | कडाव एसटी थांब्यावरीस बेकायदेशीर अतिक्रमणाबाबत ग्रामपंचायतीची उदासीनता आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात सर्व पत्रकारांनी एकत्र येत १५ जुलै रोजी कडाव येथे ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. याबाबत तहसीलदार आणि पोलीस यांना निवेदन देण्यात आले आहे. कर्जत तालुयातील कडाव गावात १९७७-७८ साली एसटी महामंडळाने अधिकृतरित्या उभारलेल्या बस थांब्यावर आज बेकायदेशीररित्या अतिक्रमण झाले आहे.
 
येथील काही रहिवाशांनी त्याठिकाणी अनधिकृतपणे दुकाने उभारली असून, गेल्या अनेक वर्षांपासून या अतिक्रमणाविरोधात पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते सातत्याने ग्रामपंचायत व एसटी प्रशासनाकडे निवेदने देत आले आहेत. मात्र, कडाव ग्रामपंचायतीकडून अद्यापही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. उलट, परवानगी न देता ग्रामपंचायतीने अनधिकृत दुकानदारांकडून घरपट्टी वसूल केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
 
यामुळे स्थानिक प्रशासन आणि राजकीय हस्तक्षेप असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.या संदर्भात २४ जून रोजी पत्रकारांनी काळ्या फिती लावून ग्रामपंचायतीवर धडक दिली होती आणि २ जुलैपर्यंत अतिक्रमण हटविण्याचा अल्टीमेटम दिला होता. मात्र, ३ जुलैपर्यंतही कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे पत्रकार व सामाजिक संघटनांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. या पोर्शभूमीवर, १५ जुलैपासून कडाव ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे लेखी पत्र कर्जत तहसीलदार, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, कर्जत आणि कर्जत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.
 
सार्वजनिक हक्कांचे उल्लंघन, प्रशासनाची उदासीनता आणि पत्रकारांना धमया मिळणे या सर्व प्रकारांचा पत्रकारांनी तीव्र निषेध केला आहे. या निवेदनावर सर्व पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांची स्वाक्षरी असून, याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार दिगंबर चंदने, दीपक बोराडे, संघटनेचे अध्यक्ष भूषण प्रधान, कैलास म्हामले, रोशन दगडे, नरेश जाधव, किशोर गायकवाड, गणेश लोट, प्रभाकर गंगावणे आदी पत्रकार उपस्थित होते.
 
 
Powered By Sangraha 9.0