पनवेलमध्ये पोलीस बनून लुटणारा भामटा गजाआड

31 Jul 2025 17:59:46
 panvel
 
पनवेल | पोलीस असल्याची बतावणी करुन सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटणार्‍या एका सराईत गुन्हेगारास पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे. वलप गाव येथे राहणारे अमरावती रामकरण भारद्वाज (वय ५०) यांच्या बाबाचा ढाब्याजवळ विशाल भाऊसाहेब सगलगिले (वय ४३) हा भामटा आला आणि त्याने पोलीस असल्याची बतावणी करून दमदाटी करण्यास सुरुवात केली.
 
त्यानंतर रामकरण यांच्याकडून गळ्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन त्यांची फसवणूक करून तो पसार झाला. याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिरुद्ध गिजे, पोलीस उपनिरीक्षक राजपूत व त्यांच्या पथकाने घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजवरुन तपासाला सुरुवात केली.
 
रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे गुन्हे अभिलेख तपासून त्याच्या आधारावर संशयिताचा शोध घेतला. तळोजा एमआयडीसी येथील गुप्त बातमीदारामार्फत या भामट्याचे लोकेशन मिळाले. पोलिसांनी तळोजा एमआयडीसी येथून विशाल सगलगिले याच्या मुसक्या आवळल्या. त्याला पोलीस स्टेशन येथे आणून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. विशाल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर इतर ३ पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. याबाबत पोलीस उपनिरीक्षक राजपूत हे पुढील तपास करीत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0