खालापूर टोल नाक्यावर बोगस व्हीआयपी पासची विक्री; कर्मचारी अटकेत

31 Jul 2025 13:16:33
 KHOPOLI
 
खोपोली | खालापूर टोल नाक्यावर कार्यरत असलेल्या सुरक्षारक्षकाने कंपनीचे बोगस व्हीआयपी पास बनवून विक्री केल्याची घटना घडली. याप्रकरणी खालापूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणात आणखी काहीजण असण्याची चर्चा आहे. सावरोली गावाजवळ खालापूर टोलनाका आहे.
 
या ठिकाणी सावरोली गावातील ओंकार रामचंद्र महाडीक हा त्याच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या जागी ठेकेदारी पध्द्तीवर सुरक्षारक्षक म्हणून कामावर रुजू केला होता. नोकरी करीत असताना या टोलनाक्यावरुन ये-जा करणार्‍या रायगडसह पुणे, मुंबई, ठाणे येथील बड्या वाहनांच्या मालकांशी व तालुक्यातील कार्यकर्ते, नेत्यांशी ओळख झाली होती.
 
या ओळखीतून ओंकार याने अनेकांना कंपनीचे व्हीआयपी पास विक्री केल्याची तक्रार आयआरबी कंपनीच्या अधिकारी जयवंत नारायण देसले यांनी खालापूर पोलीस ठाण्यात केली होती. त्यानुसार ओंकार महाडीक याला मंगळवारी, २९ जुलै रोजी त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे. त्याला खालापूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
 
Powered By Sangraha 9.0