रोहा-तांबडी रस्ता पुन्हा संकटात! मोठे दगड, झाडांसह माती रस्त्यावर येण्याचा धोका

31 Jul 2025 13:42:41
roha
 
धाटाव | मुख्य जिल्हा मार्ग क्रमांक ५० वरील रोहा-तांबडी हा डोंगराळ व चढणीचा रस्ता सध्या गंभीर धोयाच्या छायेत आहे. मागील आठवड्यात पावसामुळे सात ते आठ ठिकाणी माती सरकली असून, मोठे दगड व झाडे डोंगर उतारावरून रस्त्यावर येण्याच्या स्थितीत आहेत.
 
अशा परिस्थितीत पाऊस जोरदार पडत आहेच परंतु आणखी पावसाचा जोर वाढला, तर वाहतूक पूर्णपणे बंद होण्याचा आणि जीवितहानी होण्याचा धोका वाढला आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे याच डोंगर भागाचा काही भाग रस्त्यालगत सात ते आठ ठिकाणी पडलेला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी त्याने तात्काळ लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणीदेखील प्रवासी व वाहतूकदारांनी केलेली आहे.
 
हा रस्ता अनेक गावांना जोडणारा प्रमुख दुवा असल्यामुळे प्रवाशांसाठी अत्यावश्यक आहे. हा जो जोड रस्ता रोहा-मुरुड, तळा तसेच तांबडी, बाराशेत, म्हसाडी, सवाणे व वाली अशा गावांना रस्ता आहे. परंतु रोहा हनुमान टेकडीपासून चढणीचा भाग असल्याने वाहने आधीच अडथळ्याने जात आहेत. याशिवाय, रात्रीच्या वेळी या मार्गावर कोणतीही प्रकाश व्यवस्था नसल्याने अपघाताची शयता आणखी वाढते.
 
यामुळे प्रवासी वर्ग व वाहतूकदारांकडून प्रशासनाकडे तात्काळ स्थायी उपाययोजनांची जोरदार मागणी केली जात आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यालगत स्लोप स्टॅबिलायझेशन, संरक्षक भिंती, चेतावणी फलक अशी मागणी होत असून लोकप्रतिनिधींनीही या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष न करता लक्ष देणे गरजेचे आहे.
 
धोका स्पष्टपणे समोर दिसत असताना, उपाययोजना न होणे म्हणजे शेवटी एखाद्या दुर्घटनेची वाट पाहणे, असा संतप्त सूर आता नागरिक, प्रवासी आणि वाहनचालकांमध्ये मनात साशंकता येऊ लागलेली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी नक्की कोणती भूमिका घेतात? हेदेखील पाहणे तेवढेच महत्त्वाचे आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0