आमिषाला भुलला, मातीचे गाठोडे घेऊन घरी परतला , गुप्तधनासाठी भोंदूबाबांचे अघोरी कृत्य!

31 Jul 2025 12:06:44
panvel
 
पनवेल | फसवणुकीची रोज नवीन प्रकरणे समोर येत असतात, मात्र यानंतरही अनेक लोकं आमिषाला भुलून आयुष्याच्या कमाईला हात धुवून बसतात. पनवेल येथे असेच एक प्रकरण समोर आले आहे. रोजच्या संकटांनी हैराण झालेली एक व्यक्ती अशाच भोंदू मांत्रिकांकडे जाते, आपले दुखडे ऐकवते.
 
यानंतर हे भोंदू अशी काय जादू करतात की संबंधीत व्यक्ती ३४ तोळे सोने आणि पाच लाख रुपयांची रोकड या भोंदूंच्या झोळीत टाकते आणि मातीचे गोठोडे घेऊन घरी परतते. फसवणूक झाल्याचे लक्षात याल्यानंतर या व्यक्तीने पनवेल शहर पोलिसांत धाव घेतली आहे. फिर्यादी गृहस्थाला काही काळापासून एकामागून एक आर्थिक संकटे येत होती. कौटुंबिक अडचणी होत्या. त्यामुळे ते मानसिक तणावाखाली होते.
 
याची माहिती त्यांच्या मित्राला झाल्यानंतर तो या गृहस्थाला पनवेल रेल्वे स्टेशनसमोरील एका ज्योतिषाकडे घेऊन गेला. तौसिफ मुजावर नावाचा भोंदू इसम मांत्रिक म्हणून त्यांच्या समोर आला. त्याने अन्य दोन साथीदार मेहताब मुजावर आणि अझर मुजावर यांनाही बोलावून घेतले. फसवणूक झालेल्या गृहस्थाने आपल्या अडचणींचा पाढा त्यांच्यासमोर वाचून दाखवला. सावज आपल्या टप्प्यात असल्याचे या भोंदू मांत्रिकांच्या लक्षात आले होते, त्यांनीही मग ‘तुमच्या शेतात गुप्तधन आहे, तिथे पीर बाबाची शक्ती आहे’ अशी थाप मारली.
 
शेतात गुप्तधन बाहेर काढण्यासाठी पूजा केली तर कुटुंबाला होणारा त्रास कमी होईल, असा बनाव या भोंदू मांत्रिकांनी रचला आणि शेतात जाऊन पूजा केली. पुढे एका फार्महाऊसवर सलग चार दिवस विधी केला. जवळच्या करंजाडे इथे असणार्‍या आणखी एका शेतावर खड्डा खोदण्यास सांगून तिथेही पूजेचा बनाव रचला. पूजा झाली, त्यानंतर सोन्याचे तावीज आणि चैन तिथे देण्यात आली. भोंदू मांत्रिकाने शेवटचा विधी करावा लागेल, सांगून तौसिफने सोने आणि काही रकमेची मागणी केली.
 
आपल्या आयुष्याचे टेंशन जाईल, या आशेने त्या गृहस्थानेही विधी करण्याची तयारी दाखवत ३४ तोळे सोने आणि पाच लाख रुपयांची रोकड असा सुमारे ४० लाख रुपयांचा ऐवज भोंदूच्या झोळीत टाकला. भोंदूची झोळ भरली होती, त्यांनीही मग एका कपड्यात काहीतरी बांधून त्या गृहस्थाला दिले. विधी पूर्ण होताच आपल्या शरीरात शक्ती संचारून ती परवानगी देईल, तोपर्यंत हे गाठोडे उघडू नका, नाहीतर गुप्तधनाची व सोन्याची माती होईल, असे या मांत्रिकाने बजावून ठेवले.
 
साधारण महिनाभर मांत्रिकाचा काहीच थांगपत्ता नाही. त्यामुळे तक्रारदाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी शेवटी बहिणीच्या घरी जात तिथे ते कपड्याचे बांधलेले गाठोडे सोडले असता, गाठोड्यात गुप्तधन वगैरे नसून, माती होती. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी पनवेल पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0