खराब रस्त्यांमुळे अपघात झाल्यास... सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार

30 Jul 2025 21:05:24
alibag  
 
अलिबाग | रस्ते अपघात टाळण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग तसेच परिवहन विभाग यांनी तातडीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. या सर्व मार्गांवर रस्ते दुरुस्तीअभावी अपघात घडल्यास संबंधित यंत्रणेवर जबाबदारी निश्चित करुन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले.
 
मंगळवारी (२९ जुलै) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी जावळे बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक आचल दलाल, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड, पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांसह सर्व कार्यन्वयीन यंत्रणा उपस्थित होत्या. यावेळी रायगड ग्रामीण पोलीस तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या वर्षात झालेल्या अपघातांचा व त्या अनुषंगाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.
 
तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, एनएचएआय, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम- राष्ट्रीय महामार्ग विभाग, पनवेल महानगरपालिका हद्दीतील धोकादायक अपघात ठिकाणांबाबतचा (ब्लॅकस्पॉट) आढावा घेऊन केलेल्या उपाययोजना व त्यानंतर अपघात प्रमाणात झालेली घट याबाबत चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्ह्यात महामार्ग, राज्य मार्ग यांवरील ब्लॅक स्पॉट शोधून त्यावर उपाययोजना, दर्शक सुचना फलक लावणे, वेग मर्यादा दर्शक फलक लावणे, महामार्गावर अनधिकृतरित्या दुभाजक तोडून ठेवले आहेत, ते पुन्हा स्थापीत करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करणे आदी उपाययोजना राबवाव्या.
 
जिल्ह्यातील रस्ते अपघाताचे प्रमाण शून्यावर आणणे, अपघातानंतर जखमींना तात्काळ उपचार सुविधा उपलब्ध करुन मृत्यूदर शून्यावर आणणे या उद्दिष्टांसह हे काम गांभीर्याने करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जावळे यांनी दिले. दरम्यान, व्यवसायाला लाभ व्हावा, यासाठी काही व्यावसायिक मुख्यमार्गिका आणि सेवारस्ता यामधील डिव्हायडर तोडत असल्याचे निदर्शनास आले आहे. सेवारस्त्यावरील वाहन अचानक थेट मुख्य मार्गिकेवर तसेच मार्गिकेवरील वाहन अचानक वळत असल्यामुळे अपघात होऊ शकतात. त्यामुळे या व्यावसायिकांच्या विरोधात कठोर कारवाईची शिफारस यावेळी करण्यात आली.
 
तसेच वाहतुकीला अडथळे आणणार्‍या होर्डिंगला तातडीने हटविण्याचे निर्देश देखील जिल्हाधिकारी जावळे यांनी दिले. आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावेत, असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणांना दिले. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण, पनवेल, अधीक्षक अभियंता, रेसीलीयंट इंडिया नाशिक (एनजीओ) या संस्थांनी आपले सादरीकरण केले.
Powered By Sangraha 9.0