काँगे्रसला धक्का रायगडातील काँग्रेसचे नेते , अ‍ॅड.प्रविण ठाकूर निघाले राष्ट्रवादीत

30 Jul 2025 12:58:13
alibag
 
अलिबाग | काँग्रेस पक्षाचे प्रदेश चिटणीस आणि रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते अ‍ॅड.प्रविण मधुकर ठाकूर हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. २ ऑगस्ट रोजी अलिबाग येथे हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार असून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पक्षात स्वागत करणार आहेत.
 
अ‍ॅड. ठाकूर हे स्व. आमदार मधुकर ठाकूर यांचे सुपूत्र असून, २००९ मध्ये त्यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी करत निवडणूक लढविली होती. त्यांचा स्थानिक राजकारणात सक्रीय आणि प्रभावी सहभाग राहिलेला आहे. अलिबाग नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. काँग्रेस पक्षाच्या सध्याच्या कार्यशैलीवर ते नाराज असल्याची चर्चा आहे.
 
त्यामुळेच ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. २ ऑगस्ट रोजी अलिबाग येथील हॉरीझन सभागृहात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रायगडचे खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे यावेळी उपस्थित राहणार आहेत. "काँग्रेसमध्ये सध्या कुठलाही ताळमेळ उरलेला नाही. कार्यकर्त्यांचा आवाज दाबला जातोय.
 
त्याउलट राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोकण व रायगडसाठी स्पष्ट दिशा व धोरण आहे. या पार्श्वभूमीवर मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला” अशी भूमिका अ‍ॅड. ठाकूर यांनी स्पष्ट केली. अ‍ॅड. प्रविण ठाकूर यांनी यापूर्वी अलिबाग नगरपालिका, लोकसभा आणि विधानसभा या निवडणूका लढविल्या आहेत. वकिली क्षेत्रातही त्यांची मोठी झेप आहे. वडिलांचा राजकीय वारसा चालविताना मात्र त्यांनी काँग्रेसला ‘राम राम’ करीत वेगळी वाट निवडली आहे. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी चर्चा आहे.
सुनील तटकरे यांचे छोटे छोटे सर्जिकल स्ट्राईक
रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये जोरदार वाद आहेत. शिवसेनेचे आमदार आजच्या घडीला तटकरे यांच्यासोबत राहिलेले नाहीत. त्यामुळे तटकरे यांनी विविध पक्षांच्या प्रमुख पदाधिकार्‍यांना, कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत घेण्याचा सपाटा लावला आहे.
 
नुकतेच माणगाव येथील शिवसेनेचे नेते अ‍ॅड.राजीव साबळे यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला आहे. त्यांच्यानंतर आता अ‍ॅड. ठाकूर प्रवेश करीत आहेत. तटकरेंचे हे छोटे छोटे ‘सर्जिकल स्ट्राईक’ विरोधकांसाठी धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0