पनवेल | मुंबई विभागातील सर्वात मोक्याच्या ठिकाणी असणार्या पनवेल एसटी आगाराचे मॉडिफिकेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याठिकाणी विमानतळाच्या धर्तीवर ‘बस पोर्ट’ उभारण्याचा प्रस्ताव होता. २०१८ ला यासंदर्भात हिरवा कंदील मिळाला होता. परंतु गेल्या सात वर्षांत कोणत्याही हालचाली न झाल्याने प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी पावसाळी अधिवेशनात बुधवारी (२ जुलै) औचित्याच्या मुद्द्याच्या आधारे सभागृह आणि शासनाचे लक्ष वेधले.
‘पनवेल बस एसटी स्थानक | टोलेजंग स्वप्नाची खंडर अवस्था’ या शीर्षकाखाली ‘रायगड टाइम्स’ने २६ जून रोजी वृत्त प्रसिद्ध करुन हा प्रलंबित प्रश्न उपस्थित केला होता. मुंबईचे प्रवेशद्वार समजल्या जाणार्या पनवेलमधील बस आगारात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ येथून एसटी गाड्या ये-जा करीत असतात. त्यातून दररोज हजारो प्रवाशांची वाहतूक होते. याशिवाय नोकरी- धंद्यासाठी आजूबाजूच्या परिसरातून हजारो नागरिक या बसस्थानकातून प्रवास करतात.
त्यासाठी पनवेल आगारातून ५६ गाड्यांच्या मदतीने रोज ४८ नियते चालवली जातात. यामध्ये सातारा, एरंडोल, धुळे, अहमदनगर व शिर्डी या सहा लांब पल्ल्याच्या, मध्यम पल्ल्याच्या नऊ महाड विनावाहक आणि सुमारे ७० फेर्या गाव पातळीवरील आहेत. अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असणार्या या बस आगाराची दुरावस्था झाल्याने ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर बस पोर्ट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार निविदा प्रक्रिया ही पूर्ण पार पडली. एजन्सीसुद्धा नियुक्त करण्यात आली. २०१८ ला यासंदर्भात पावले उचलण्यात आली असली तरी पुढे कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत.

परवानगी आणि इतर तांत्रिक अडचणीत पनवेल बस स्थानक अद्यापही त्याच अवस्थेत असून, प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत सातत्याने यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले. मध्यंतरी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अचानकपणे पनवेल बस स्थानकाला भेट दिली. या ठिकाणची दुरवस्था पाहून त्यांनीसुद्धा तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत, त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. परंतु प्रत्यक्षात परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने याला शासकीय अनास्था कारणीभूत आहे का? असा सवाल विचारला जात आहे.
‘रायगड टाइम्स’ने २६ जून रोजी या प्रलंबित प्रश्नाबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून बस स्थानकाबाबतच्या स्वप्नांना कशाप्रकारे खिळ बसली? याबाबतची वस्तुस्थिती प्रकाशात आणली. दरम्यान, पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांनी औचित्याचा मुद्द्याद्वारे पनवेल बस पोर्टच्या रखडपट्टीचा पाढा वाचला. परिवहन मंत्र्यांनी या ठिकाणी भेट दिली असताना अद्यापही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नसल्याची खंत आ. ठाकूर यांनी व्यक्त केली.
रखडपट्टीने हद्द ओलांडली!
अत्यंत महत्त्वाचे समजल्या जाणार्या पनवेल बस स्थानकाचे ‘बांधा, वापरा, हस्तांतर करा’ या तत्वावर कामास२०१६ साली मान्यता देण्यात आली होती, त्यानंतर सन २०१८ मध्ये सदर बस स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली होती. परंतू जवळपास ७ वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊनसुद्धा बस स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामास सुरुवात झाली नाही. पुनर्विकासाच्या नावाखाली जुने बस स्थानक पाडून तात्पुरते शेड उभारण्यात आले आहे.