छत्र निजामपूर नको! आता ‘किल्ले रायगड ग्रामपंचायत’ करा , आमदार गोपीचंद पडाळकर यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

03 Jul 2025 19:50:56
 mahad
 
महाड | किल्ले रायगडवर धनगर समाजाची भेट घेण्यासाठी आलेले आमदार गोपीचंद पडाळकर यांनी किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या ‘छत्री निजामपूर’ गावाच्या नावाला आक्षेप घेतला आहे. जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची राजधानी स्थापन केली, तो रायगड किल्ला आज "छत्र निजामपूर ग्रामपंचायत” या नावाने ओळखला जातो, ही आपल्या अस्मितेची शोकांतिका आहे, असे आ.पडाळकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
 
बुधवारी (२ जुलै) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आ.पडाळकर यांनी भेट घेऊन ‘छत्र निजामपूर’ हे नाव बदलून ‘किल्ले रायगड ग्रामपंचायत’ असे करण्याची अधिकृत मागणी करणारे निवेदन सादर केले. या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात रायगडवाडी, वाघेरी, हिरकणवाडी, नेवाळीवाडी, पेरूचादांड, आदिवासीवाडी यासह अनेक ऐतिहासिक वाड्यांचा समावेश आहे.
 
छत्रपतींच्या राजधानीला तिचा गौरवशाली इतिहास सन्मान मिळावा. या मागणीवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी विनंती त्यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांना केली.
Powered By Sangraha 9.0