लोणेरे | महायुती असतानाही सुधाकर घारे यांना कर्जत मतदारसंघातून अपक्ष उभे केले. घारे यांनी पक्षातून हकालपट्टी केल्याचे चित्र उभे केले गेले. निवडणुकीनंतर त्याच घारे यांना तटकरेंनी पुन्हा पक्षात घेतले आणि जिल्ह्याच्या अध्यक्षपदाची बक्षिसी बहाल केली, अशी टिका कर्जतचे आ.महेंद्र थोरवे यांनी केली आहे.
शिवसेनेचे (शिंदे गट) रायगड जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या वाढदिवसानिमित उपस्थित होते. यावेळी बोलताना थोरवे यांनी पुन्हा एकदा सुनील तटकरे यांच्यावर तोंडसुख घेतले. शिवसेनेचे पूर्वीचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांचे सुनील तटकरे यांच्याशी घरोब्याचे संबंध राहिले आहेत. त्यामुळे श्रीवर्धन मतदारसंघात ठाकरेंकडून कायम दुय्यम उमेदवार उभा करुन तटकरेंना एकप्रकारे मदत करण्यात येत होती, असे थोरवे म्हणाले.
लोकसभेला अनंत गीते यांना पक्षाने उमेदवारी दिली होती. मात्र गीते यांच्याऐवजी तटकरे निवडून यावेत, असे ठाकरे आणि नार्वेकर या दोघांनाही वाटत नव्हते. त्यांचे पारडे तटकरेंच्या बाजूने राहिले आहे, असा आरोप आ.थोरवे यांनी केला. या घाणेरड्या राजकारणाला कंटाळून आम्ही बाहेर पडलो, असेही ते यावेळी म्हणाले.
आम्ही जो संघर्ष केला, जे रक्त सांडवले ते शिवसेना वाढविण्यासाठी होते. बाळासाहेबांनी आम्हाला शिकवण दिली होती, शिवसेना एकसंघ राहिली पाहिजे. शिवसेना एकत्र राहिली पाहिजे; परंतु ‘मातोश्री’चा आशीर्वाद सुनील तटकरेंना कायमस्वरुपी राहिला होता आणि त्यामुळे रायगडातील शिवसेना वाढत नव्हती. उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतरही तटकरेंच्या कन्येला पालकमंत्रीपद दिले गेले, असेही थोरवे यांनी म्हटले आहे.