महाड | युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडकिल्ल्यांचा समावेश झाला ही आनंदाची बाब असून या सर्व गड किल्ल्यांचे जतन व संवर्धन दुर्गराज ‘किल्ले रायगड’प्रमाणे करावे, अशी मागणी रायगड प्राधिकरणचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे.
शुक्रवारी, २५ जुलै रोजी संभाजीराजे यांनी महाड येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग महाडच्या कार्यकारी अभियंता श्रीमती निकम, प्राधिकरणचे अभियंता भामरे उपस्थित होते. गेल्या ५ वर्षांपासून किल्ले रायगडचे जतन व संवर्धनाचे काम रायगड प्राधिकरणामार्फत युनेस्कोच्या मार्गदर्शक तत्वानुसार सुरु आहे.
त्यामुळे किल्ले रायगडावर सुरु असलेल्या कामाचा आदर्श समोर ठेवून महाराष्ट्रातील १० व तामिळनाडूतील एका किल्ल्याचे संवर्धन केले जावे. तसे न केल्यास युनेस्कोचे मानांकन रद्द केले जाऊ शकते. यापूर्वी ओमानमधील युनेस्कोने दिलेले मानांकन रद्द केल्याचे उदाहरण संभाजी राजे यांनी दिले. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या राजमाता जिजाऊ यांच्या राजवाड्याची झालेल्या दुरवस्थेबाबत त्यांना छेडले असता राजमाता जिजाऊंच्या राजवाडा हा पुरातत्व खात्याच्या कोअर क्षेत्रात येत असल्याने त्याचे संवर्धन व जतन हे पुरातत्व खात्याकडूनच टप्प्या टप्प्याने केले जाईल;
मात्र पुरातत्व खात्याने परवानगी दिल्यास या राजवाड्याचे संवर्धन रायगड प्राधिकरणमार्फत केले जाईल, असे संभाजीराजे यांनी सांगितले. किल्ले रायगडच्या पायरी मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. याबाबत संभाजीराजे यांचे लक्ष वेधले असता, रायगड प्राधिकरणमार्फत सुरु असलेल्या कामात भ्रष्टाचार होणे अशक्य असून दुय्यम दर्जाचे काम आपण खपवून घेणार नाही.
पायरी मार्गाच्या कामात एखाद-दुसरा दगड बाहेर आला असेल तर त्या कामाची दुरुस्ती करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात येतील तसेच लवकरच आपण संवर्धनाचे काम करणार्या सर्व ठेकेदारांची बैठक बोलावणार असल्याचे सांगितले. रायगडाच्या पायथ्याशी पाण्याचा प्रकल्प करणार! किल्ले रायगडच्या पायथ्याशी ७० ते ८० कोटींचा पाण्याचा प्रोजेक्ट करण्याचा आपला मानस असून त्याचा मास्टर प्लॅन तयार आहे.
या प्रकल्पातील पाणी किल्ले रायगडावर नेण्यात येईल, असे सांगत याबाबत लवकरच आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. काळ जलविद्युत प्रकल्प सुरु व्हावा, यासाठी आपण पाठपुरावा करु, असेही पत्रकारांच्या मागणी नंतर संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.
किल्ले रायगडावर पिढ्यान पिढ्या वास्तव्य करून असलेल्या धनगर समाजाला पुरातत्व खात्याने गड खाली करण्याच्या दिलेल्या नोटीसा या चुकीच्या असून रायगड प्राधिकरणाच्यावतीने या समाजासाठी किल्ले रायगड, पायरी मार्ग व पायथ्याशी स्टॉल निर्माण करुन त्यांना रोजगार देण्याचा आपला आग्रह असेल, असे संभाजीराजे यांनी सांगितले. किल्ले रायगड व पायथ्याशी लाईट अॅन्ड साऊंड सिस्टीमला परवानगी मिळाली असून किल्ले रायगडावरील हे काम पूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
किल्ले रायगडावर उत्खननात सापडलेल्या वस्तूंचे प्रकाशन करावे, अशी आपली मागणी असून सध्या या वस्तू संभाजीनगर येथील पुरातत्व विभागाकडे जमा आहेत. किल्ले रायगडच्या पायथ्याशी होणार्या शिवसृष्टीतील म्युझियममध्ये या वस्तू ठेवण्यात याव्यात, अशी मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. महाड ते रायगड या राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिलेल्या रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून हा मार्ग हेरीटेज महामार्ग व्हावा या मागणीसाठी आपण केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असून या महामार्गाला महाड पासून किल्ले रायगडला आल्याचा आभास व्हावा, असे शिवकालीन स्वरुप द्यावे, असे काम करण्याची मागणी करणार असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.