नवी मुंबई पोलिसांच्या हाती गुटख्याचे घबाड! गुटख्याचे चार कंटेनर जप्त, चारजण अटकेत

26 Jul 2025 13:14:19
panvel
 
पनवेल | नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने भिवंडी आणि मध्य प्रदेशातून आणलेला तब्बल ३ कोटी ७७ लाख २८ हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत ५ कंटेनर आणि ४ जणांना अटक करण्यात आली आहे. सदर गुटख्याचा साठा कोठून आणला? आणि कोठे विक्रीसाठी नेला जाणार होता? याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
 
अंमली पदार्थ विरोधी पथकाने मुंबई- पुणे महामार्गावर कामोठे येथे भिवंडी येथुन कामोठे येथे विक्रीसाठी आणण्यात आलेला टेम्पो पकडला होता. या कारवाईत पोलिसांनी फरहान माजिद शेख (२३) या तरुणाला अटक करुन टेम्पोसह तब्बल २२ लाख ४० हजार रुपये किंमतीचा गुटख्याचा साठा जप्त केला होता. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने फरहान याची अधिक चौकशी केली असता, त्याने सदर गुटख्याचा साठा भिवंडीतील येवई गावातून आणल्याची माहिती दिली.
 
फरहान शेखकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश धुमाळ, सुरज गोरे यांनी ३ पोलीस अधिकारी आणि २० पोलीस अंमलदार यांच्या मदतीने नाशिक-ठाणे महामार्गावरील येवई गावात छापा टाकण्यात आला. यावेळी सदर ठिकाणी प्रतिबंधित गुटख्याने भरलेले ४ कंटेनर आढळून आले. या कारवाईत पोलिसांनी ३ चालकांसह गुटख्याने भरलेले चारही कंटेनर बेलापूर येथील अंमली पदार्थ विरोधी कक्षात आणले.
 
panvel
 
त्यानंतर अन्न-औषध प्रशासनाच्या अधिकर्‍यांच्या मदतीने त्याची तपासणी केली असता चारही कंटेनरमध्ये तब्बल ३ कोटी ५४ लाख ८८ हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा असल्याचे आढळून आले. अंमली पदार्थ विरोधी पथकाने जितेंद्र मांगीलाल वसुनिया, भूपेंद्र राजेंद्र सिंग आणि भंवर खेमराज सिंग या ३ चालकांना अटक केली.
 
या संपूर्ण कारवाईत ५ कंटेनर सह तब्बल ३ कोटी ७७ लाख रुपये किंमतीचा गुटख्याचा साठा जप्त करुन एकूण आतापर्यंत ४ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी दिली. दरम्यान, कामोठे येथील कारवाईत पकडण्यात आलेला फरहान शेख याला न्यायालयाने पोलीस कोठडी ठोठावली असल्याचे राजपूत यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0