खड्ड्येमय रस्त्यांमुळे संतापलेल्या दिघोडे ग्रामस्थांचे खड्ड्यांमध्येच आंदोलन

26 Jul 2025 13:26:34
 uran
 
उरण | अटल सेतू ते दिघोडे फाटा या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे संतापलेल्या दिघोडेतील ग्रामस्थांनी शुक्रवारी (२५ जुलै) चक्क दिघोडे फाट्यावरील रस्त्यामध्ये पडलेल्या खड्ड्यातील चिखलामध्येच बसून आंदोलन केले. दिघोडे फाटा येथे हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्ते जवळजवळ दीड तास रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांतील चिखलात बसून होते.
 
त्यामुळे मुंबई व कोकणच्या दिशेने जाणार्‍या वाहनांची रांग लागली होती. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग उरणचे उपअभियंता नरेश पवार, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. रस्ता खड्डेमुक्त करण्यासाठी तसेच वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी असा लेखी पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहे. यानंतर हे आंदोलन स्थगित केल्याचे सरपंच किर्तीनिधी ठाकूर यांनी सांगितले.
 
त्यांनी आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या दिघोडे गावातील ग्रामस्थ, प्रवासी नागरिक, महिलांना धन्यवाद दिले आहेत. दरम्यान, आंदोलनानंतर रस्त्याचे काम करणार्‍या पी.पी. खारपाटील कंपनीने रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात केली. या आंदोलनात दिघोडेचे माजी सरपंच अविनाश पाटील, वर्षकेतू हासूराम ठाकूर, उपसरपंच संदेश पाटील, काँग्रेस पक्षाचे नेते रामनाथ पंडित, प्रेमनाथ म्हात्रे, माजी सरपंच संकीता जोशी, अ‍ॅड.निग्रेस पाटील, अलंकार पाटील, माजी उपसरपंच आरती कोळी, सदस्य अलंकार कोळी, रेखा कोळी, कैलास अंबाजी म्हात्रे, अभिजित पाटील, अपेक्षा पाटील, अपेक्षा कासकर, महेश म्हात्रे, सचिन कासकर, नरहरी कोळी, रुतुराज पाटील तसेच परिसरातील प्रवासी नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
 
 
Powered By Sangraha 9.0