म्हसळा | वांगणी, मोरवणे, घूम परिसरात बिबट्याची दहशत ; तीन महिन्यांत दोन शेतकर्‍यांची सहा गुरे, एक कुत्रा केला फस्त

23 Jul 2025 17:47:02
 mhasla
 
म्हसळा | म्हसळा तालुक्यातील वांगणी, मोरवणे, घूम परिसरात बिबट्याने चांगलीच दहशत निर्माण केली आहे. गेल्या तीन महिन्यांत मोरवणे गावातील दोन शेतकर्‍यांची गोठ्यात बांधलेली तीन वासरे, घूम गावातील एकाच शेतकर्‍याची दोन वासरे बिबट्याने फस्त केली आहेत.
 
१६ जुलै रोजी वांगणी येथील सितप यांच्या शेतघरात वासरावर हल्ला केल्याची घटना घडली असून १७ जुलै रोजी वांगणी येथील शेतकरी अशोक कृष्णा नाईक यांच्या मालकीचा चरायला सोडलेला २.५ वर्षांचा बैल ठार मारला. याच दिवशी नाईक यांचा शेतजमिन रखवालदार विजय वाघमारे यांच्या पाळीव कुत्र्याची बिबट्याने शिकार केली असल्याचे सांगण्यात आले.
 
घटनेची म्हसळा वन विभागाच्या पथकाने पाहणी करून रितसर पंचनामा केला असल्याचे शेतकरी अशोक नाईक यांनी माहिती देताना सांगितले. वन विभागामार्फत नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना योग्य ती मदत करण्यात येत असल्याचे म्हसळा परिक्षेत्र वन अधिकारी संजय पांढरकामे, वनपाल राठोड यांनी माहिती दिली आहे.
Powered By Sangraha 9.0