कोलाड | मुंबई-गोवा महामार्ग ६६ वरून पुगांव नम्रता ढाबा ते गारभटकडे जाणार्या मार्गांवरील रस्त्याच्या दोन्ही बाजूला असंख्य ठिकाणी झाडेझुडपे वाढली असून प्रचंड वाढलेल्या झाडांमुळे जणू रस्ताच हरवला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणार्या विद्यार्थ्यांसह प्रवासी नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
नम्रता ढाबा ते गारभट मार्गावर पुगांव, मढाली, डोळवहाल, ऐनवहाल, रेवेचीवाडी, गारभट, विठ्ठलवाडी, राजखलाटी, बल्हे, कांदला, अशी असंख्य गावे असून या मार्गांवरून शाळेतील येजा करणारे विद्यार्थी, कोलाड- खांबकडे बाजारपेठेत येणारे नागरिक, दुध विक्रेते तसेच धाटाव एम.आय.डी. सी.कडे कामावर जाणारे कामगार याच मार्गांवरून येजा करीत असतात. परंतु हा मार्ग झाडाझुडपांनी वेढालेला आहे.
शिवाय या मार्गाला असणारी वेडीवाकडी वळणे तसेच आजूबाजूला असणारे जंगल यामुळे समोरून येणारी वाहने दिसत नसल्यामुळे या मार्गावर मोठा अपघात होण्याची शयता निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम खाते यांनी लक्ष देऊन प्रचंड वाढलेली झाडेझूडपे तोडण्यात यावी, अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणार्या प्रवासी नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.