तळोजा कारागृहात कैद्यावर दुसर्‍या कैद्यांचा हल्ला

21 Jul 2025 15:49:04
 panvel
 
नवीन पनवेल | तळोजा कारागृहात बंदीस्त असलेल्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी शामिल साकिब नाचण आणि इरफान मुस्तफा लांडगे या दोघांनी मोक्कांतर्गत कैदेत असलेल्या गिरीश कुमारन नायर याच्यावर रंगकाम करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या पत्र्याच्या सहाय्याने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात नायर जखमी झाला आहे.
 
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी शामिल साकिब नाचण आणि इरफान मुस्तफा लांडगे तसेच जखमी गिरीष नायर असे तिघेही तळोजा कारागृहातील सर्कल १ मधील वेगवेगळ्या बॅरेकमध्ये बंदीस्त आहेत. १८ जुलै रोजी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास शामिल नाचण आणि इरफान लांडगे या दोघांनी जुन्या भांडणाच्या वादातून गिरीश नायर याच्यावर रंगकाम करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पत्र्याने हल्ला केला.
 
या हल्ल्यात कैदी गिरीष नायर गंभीररित्या जखमी झाल्याने कारागृह पोलिसांनी त्याला तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारानंतर पुन्हा त्याला कारागृहात आणण्यात आल्याची माहिती तळोजा कारागृहाचे अधीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात आरोपी शामिल नाचण आणि इरफान लांडगे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही वाघ यांनी सांगितले.
 
 
Powered By Sangraha 9.0