महाड | कोकणातील सुपारी पिकाचा भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत समावेश करण्याचे आदेश राज्याचे रोहयो फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी दिले आहेत. १७ जुलै रोजी विधानभवन मुंबई येथे आयोजित करण्यारत आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
त्यानंतर ना. गोगावले यांनी ही घोषणा केली. या बैठकीला कृषि विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी, फलोत्पादन विभागाचे उपसचिव श्रीकांत दांडगे, फलोत्पादन संचालक अंकुश माने, ना. गोगावले यांचे खाजगी सचिव ज्ञानोबा बाणापुरे, विशेष कार्य अधिकारी दत्तात्रेय भिसे, स्विय सहाय्यक मनोज जाधव उपस्थित होते.
कोकण किनारपट्टीवर सिंधुदुर्गातील वैभववाडी, सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ, देवगड, मालवण आणि रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, रत्नागिरी, गुहागर, दापोली, मंडणगड त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, म्हसळा, अलिबाग, मुरुड येथे सुपारीची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे. श्रीवर्धन येथील रोठा सुपारी प्रसिध्द आहे. सुपारीच्या रोठासह विविध जातींच्या लागवड सलग आणि नारळ आंतर पिक म्हणून केली जाते.
या सुपारी पिकाचा समावेश भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतील १६ फळपिकांमध्ये समावेश नसल्याचे ना. गोगावले यांनी या बैठकीत निदर्शनास आणून दिले. गेल्या काही वर्षात निसर्ग चक्रीवादळ, तौक्ते चक्रीवादळ यामुळे इतर पिकांबरोबरच सुपारी पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बाजारपेठेत वाढती मागणी असल्याने सुपारी लागवडीतून शेतकर्यांना आर्थिक लाभ होतो.
निसर्ग वादळामुळे कोकणातील सुपारी उत्पादक शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. कोकणातील शेतकर्यांची सुपारी लागवड करण्याकरिता मागणी असून, ज्या शेतकर्यांना रोजगार हमी योजनेंतर्गत सुपारी लागवडीचा लाभ घेता येत नाही, अशा सुपारी उत्पादक शेतकर्यांना या योजनेत समाविष्ट करुन घेण्याचे आदेश ना. गोगावले यांनी दिले.