खालापूरात कापूर उत्पादक कंपनीमध्ये भीषण आग , सुदैवाने जीवितहानी नाही; कंपनीचे मोठे नुकसान

18 Jul 2025 17:50:59
 KHOPOLI
 
खोपोली | खालापूर तालुक्यातील कुंभिवली गावात केमिकल्सयुक्त कापूर उत्पादन करणार्‍या मंगलम ऑरगॅनिक्स कंपनीतील जुन्या प्लांटमध्ये भीषण आग लागल्याची घटना बुधवारी, १६ जुलै रोजी रात्री घडली आहे. कंपनीतील अग्निशमन दलाची गाडी बंद पडल्यामुळे बाहेरून अग्निशमन दलाची वाहने पोहचेपर्यंत कंपनीत अग्नितांडव सुरु होता.
 
या अग्नितांडवातून कामगार बाहेर पळाल्याने अनर्थ टळला आहे. कुंभिवली ग्रामपंचायत हाद्दीत केमिकल्सयुक्त कापूर उत्पादन करणारी मंगलम ऑरगॅनिक्स कंपनी आहे. या कंपनीतील जुन्या प्लांटमधील फिल्टरजवळ शॉर्टसर्कीट झाल्याने आग लागल्याच अंदाज आहे. कापूर आणि इतर ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे ठिणगीचे मोठ्या आगीत रूपांतरण झाले. आग लागल्याने कामगार बाहेर पळाले आणि स्वताचा जीव वाचवला.
 
आगीची माहिती मिळताच खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी खोपोली नगरपालिकेच्या अग्निशमन दलाची वाहने बोलविली त्यांनी आग विझविण्यासाठी शर्तीने प्रयत्न केले. आगीची तीव्रता पाहून आलाना कंपनी, पेण नगरपरिषद, कर्जत नगरपरिषद, पातळगंगा एमआयडीसी, गोदरेज कंपनीतील अग्निशमन वाहने बोलविण्यात आली.
 
खालापूरचे पोलीस निरिक्षक सचिन पवार आणि मंडळ अधिकारी संदेश पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली आग विझविण्यासाठी शर्तीने प्रयत्न करण्यात आले. हेल्प फाऊंडेशनच्या मेंबर्सनी ही मदत केली आहे. या कंपनीत ही दुसर्‍यांदा आग लागल्याची घटना घडली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0