विधानभवनात दोन गटांत हाणामारी! महाराष्ट्राला लाजवणारी घटना

18 Jul 2025 16:21:02
mumbai
 
मुंबई | विधानसभेत पावसाळी अधिवेशन सुरु आहे. गुरुवारी (१७ जुलै) सभागृहात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा सुरु होती आणि बाहेर विधिमंडळाच्या लॉबीत जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांत विधानभवनातच तुफान राडा पहायला मिळाला. एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली. गल्लीबोळातील गावगुंडांनी वागावे, असे वर्तन विधानभवनात पहायला मिळाले.
 
या घटनमुळे महाराष्ट्रात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी विधानभवनाच्या बाहेर गेटवर गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात जोरदार वाद झाला होता. वाद इतक्याटोकाला गेला होता की, गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांनी एकमेकांना शिवीगाळ केली. पडळकरांच्या गाडीचा दरवाजा लागल्याचा आरोप आव्हाडांनी केला होता. गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातील वाद कॅमेर्‍यात कैद झाला होता.
 
यामध्ये एकीकडे जितेंद्र आव्हाड गोपीचंद पडळकर यांना ‘जा जा’ असे म्हणत असल्याचे ऐकू येत आहे. तर दुसरीकडे गोपीचंद पडळकर त्यांना, "दाखव की मी इथे एकटाच आहे. तुझ्या *** किती दम आहे बघतो. तुझ्यासारखी कुत्री घेऊन फिरत नाही” अशा शब्दांत प्रत्युत्तर देत असल्याचे ऐकू येत आहे. दुसर्‍या दिवशी म्हणजे गुरुवारी विधानभवनात आव्हाड आणि पडळकर यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.
 
त्यामुळे एकच गदारोळ उडाला. या मारामारीत आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांना मारहाण झाली. त्यांचे शर्ट फाडण्यात आले. तसेच शिवीगाळही करण्यात आली. ही घटना घडल्यानंतर आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. इथे आमदारच सुरक्षित नाहीत म्हटल्यावर कसे होणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हे गुंड मला मारण्यासाठीच आले होते, असा आरोपही त्यांनी यावेळी केली. काही वेळाने त्यांनी घडलेली सर्व घटना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कानावर घातली. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधिमंडळात अशा घटना घडणे चुकीचे आहे असे म्हटले आहे. हे क्षेत्र विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती यांच्या अधिकारक्षेत्रात येते. त्यामुळे त्यांनी गंभीर दखल घेऊन कारवाई करावी, अशी भूमिका घेतली.
गोपीचंद पडळकरांकडून दिलगिरी
गोपीचंद पडळकर यांनी घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. विधानसभेच्या प्रांगणामध्ये जी घटना घडलेली आहे, ती अत्यंत दुर्दैवी आहे.
 
याचे अतीव दुःख मला आहे, सगळ्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. पडळकर यांनी याबाबत अधिक बोलणे टाळले, तसेच माझ्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर मी अधिक प्रतिक्रिया देईन, असेही ते म्हणाले.

mumbai
 
फौजदारी कारवाई करणार; अध्यक्ष नार्वेकर
विधिमंडळ परिसरात जी घटना घडलेली आहे, ती दुर्दैवी आहे. याप्रकरणी मी अहवाल मागवला असून उद्या अहवाल मला मिळेल आणि त्यानुसार मी कारवाई करणार आहे, असे स्पष्ट शब्दांत विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
 
या हाणामारीच्या घटनेत ज्यांचा सहभाग होता, त्यांच्यावरती फौजदारी कारवाई केली जाईल आणि माझ्या अधिकारात जे आहे, त्यानुसारही कारवाई करणार आहे. विधिमंडळात अशी हिंसक कृत्य होऊ देणार नाही, यासाठी कारवाई करावी लागेल, अशा शब्दांत विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट इशारा दिला आहे.
Powered By Sangraha 9.0