...आणि कासवाने पुन्हा शर्यत जिंकली!

18 Jul 2025 18:45:59
 panvel
 
पनवेल | ससा आणि कासव यांच्या शर्यतीची गोष्ट आपणा सर्वांनाच माहिती आहे. अशीच एक महत्वाची म्हणजे जीवन मरणाची शर्यत आज कासवाने पुन्हा जिंकली असून कासव पुन्हा वडाळे तलावात आपल्या मुक्कामी सुखरूप पोहचले.... वडाळे तलाव परिसरात एका कासवाच्या तोंडात गळ अडकल्याची माहिती मुकुंद कोळी यांनी अग्निशमन केंद्राला दिली.
 
अग्निशमन विभागाचे वाहन घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी पोहोचल्यावर अग्निशमन कर्मचार्‍यांनी पाहिले की, कासवाच्या तोंडात गळ अडकलेला अत्यवस्थ आहे. त्यांनी कासवाला सुरक्षितपणे पनवेल महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडे सुपूर्द केले. महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मधुलिका लाड व डॉ. भगवान गीते यांनी तात्काळ दखल घेत कार्यवाही केली. तालुका पशुसंवर्धन विभागाचे हेमंत तोडकर यांच्या मदतीने त्याच्या तोंडातील गळ भूल देऊन यशस्वीरित्या काढण्यात आला.
 
panvel
 
सदर कासवाची वैद्यकीय तपासणी करून, कोणतीही इजा नसल्याची खात्री झाल्यानंतर वन विभागाच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत त्यास पुन्हा वडाळे तलावात सोडण्यात आले. यावेळी उपायुक्त प्रसेनजीत कारलेकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर उपस्थित होते. या कार्याबद्दल आयुक्त मंगेश चितळे यांनी अग्निशमन विभाग व पशुवैद्यकीय विभागाचे अभिनंदन केले.
 
 
Powered By Sangraha 9.0