महाड | महाड- विन्हेरे मार्गावरील करंजाडी तांबडीकोंड या गावानजिक दोन बिबटे मुक्त संचार करताना आढळून आले. वन विभागाला याची माहिती देण्यात आल्यानंतर महाडचे वनपरिक्षेत्र अधिकारी पाटील यांनी आपल्या सहकार्यांसह या ठिकाणी जाऊन फटाके फोडून या बिबट्यांना पळवून लावले.
मात्र या बिबट्यांपासून लोकवस्ती आणि पाळीव प्राण्यांना असलेला धोका विचारात घेऊन वन विभागाने या संपूर्ण परिसरात गस्त वाढविली आहे. मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तांबडी कोंड येथील ग्रामस्थांना महाड - विन्हेरे राज्य मार्गालगत दोन बिबटे फिरताना आढळून आले. रात्रीच्या वेळेसही हे बिबटे याच परिसरात फिरत होते.
या भागात लोकवस्ती असल्याने बिबट्यांपासून काही धोका निर्माण होवू नये म्हणून, वनविभागाचे पथक येईपर्यंत शिरगांवचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी ग्रामस्थांना सावध केले आणि या बिबट्यांवर लक्ष ठेवले. वनविभागाचे पथक दाखल झाल्यानंतर त्यांनी दिवसभर ही गस्त घातली. दरम्यान, ज्या भागात बिबट्यांचा वावर सुरु होता तेथून दोन तीन किलोमीटर अंतरावर या बिबट्यांने कुत्र्यावर हल्ला केल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.