नदी किनारी पूर रेषेसंदर्भात ब्ल्यू लाईनबाबत पुन्हा सर्व्हेक्षण होणार

17 Jul 2025 17:36:36
 mumbai
 
मुंबई | राज्यातील नद्यांच्या किनारी असलेल्या पूर रेषेसंदर्भात असलेल्या ब्ल्यू लाईनबाबत महसूल आणि जलसंपदा विभागामार्फत पुन्हा सर्वेक्षण केले जाईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य अ‍ॅड. अनिल परब यांनी बदलापूर जवळील उल्हास नदी पात्रात होत असलेल्या अतिक्रमणाबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
 
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकर, सतेज पाटील, डॉ. मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला. महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, नदी किनारी असलेल्या क्षेत्रातील माती उत्खनन करुन उल्हास नदीपात्रात टाकत असल्याचे निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने गौण खनिजासाठी आणि वापरण्यात आलेल्या यंत्रसामग्रीसाठी एकूण १० कोटी १६ लाख १७ हजार १४१ एवढ्या दंडात्मक रकमेचे आदेश देण्यात आले आहेत.
 
तसेच यामध्ये वापरण्यात आलेली यंत्रसामग्री जप्त करण्यात आली आहे. हा दंड वसूल करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असेहीत्यांनी यावेळी सांगितले. दहिसर येथे गणपत पाटील नगर परिसरात भराव टाकला जात असल्याबाबतच्या एका उपप्रश्नाच्या उत्तरात येथे तीन दिवसात महसूल विभागाचे अधिकारी जाऊन चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करतील, असे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे कोकण विभागातील समुद्र किनारा आणि नदी किनारी महसुली जागेवर अनेक ठिकाणी झालेले अतिक्रमण काढण्याची कार्यवाही सुरू असून अतिक्रमण केलेल्या सर्व प्रकरणांची चौकशी करण्यात येईल, असेही महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.
फणसावरील संशोधनासाठी कृषी विद्यापीठांतर्गत केंद्र स्थापन करणार
मुंबई | राज्यात विविध ७७ संशोधन केंद्र सुरू आहेत. फणसासाठी कोकण विभागात स्वतंत्र संशोधन केंद्र उभारणे शक्य नसल्याचे अभिप्राय वित्त व नियोजन विभागाने दिले आहेत. यामुळे डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत संशोधन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार दापोली कृषी विद्यापीठाकडून कार्यवाही सुरू असल्याचे कृषिमंत्री अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांनी विधान परिषदेत सांगितले.
 
तर स्वतंत्र संशोधन केंद्र स्थापन करण्याबाबत सदस्यांच्या तीव्र भावना विचारात घेऊन सर्व संबंधित लोकप्रतिनिधींची बैठक घेण्याचे निर्देश सभापती प्रा. राम शिंदे यांनी यावेळी दिले. सदस्य सदाशिव खोत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे फणस संशोधन केंद्र स्थापन करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकर, सतेज पाटील यांनी सहभाग घेतला.
 
मंत्री अ‍ॅड. कोकाटे म्हणाले, फणसाच्या मूल्यवर्धनासाठी तसेच फणस उद्योगाला चालना देण्यासाठी यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये स्वतंत्र फणस संशोधन केंद्र स्थापन करण्याऐवजी विद्यापीठामध्ये स्वतंत्र प्रयोगशाळा स्थापन करण्याचा व त्याकरिता लागणार्‍या उपकरणांसाठीचा प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या सूचना डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार दापोली कृषी विद्यापीठाकडून कार्यवाही सुरू असल्याची माहिती कोकाटे यांनी दिली.
 
 
Powered By Sangraha 9.0