कर्जत | कर्जत तालुक्यातील हालीवली गावातील स्मशानभूमीत जादूटोणा करताना काही इसम आढळून आले आहेत. हा प्रकार शुक्रवार, दि. ११ जुलै रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली. पैशांच्या हव्यासासाठी हा प्रकार सुरु असताना कर्जत पोलिसांनी धाड टाकली आणि त्यावेळी काही तरुणांची धरपकड करण्यात आली.
कर्जत नेरळ रस्त्याच्या जवळ असलेल्या हालीवली गावाच्या आदिवासी वाडीच्या बाजूला असलेल्या स्मशानभूमीत काही अनोळखी व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली आणि दोघांना पकडून चांगलाच चोप दिला. दरम्यान, त्यांच्या सोबत असलेले चौघे इसम घटनास्थळावरून पळून गेले. आदिवासी तरुणांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.
दरम्यान पकडण्यात आलेल्या दोघांमध्ये राजेंद्र शिंदे नामक स्थानिक असून दुसरा व्यक्ती पाली, सुधागड येथील असल्याचे समजते. पळून गेलेल्या इसमामध्ये स्थानिक चांगल्या वर्गातील मंडळी असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंद केला असून शासनाचे अंधश्रद्धा निर्मूलन विभाग याबाबत काय दखल घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकारामुळे समाजात आजही अंधश्रद्धा किती खोलवर रुजलेली आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. अशा रुढींविरुद्ध समाजात जागरूकता निर्माण करणे आणि कायद्याची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.