शिवसेनेसोबत युती करण्याची राष्ट्रवादीला काही हौस नाही! सुधाकर घारे यांनी आ.थोरवेंना सुनावले

12 Jul 2025 12:26:27
KARJT
कर्जत | "विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव मी मान्य केला आहे. मात्र आमदार थोरवे यांना विजयाचा आनंद घेता येत नाही. थोरवे म्हणतात, कदापिही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती केली जाणार नाही. मी म्हणतो, आम्हाला तरी कुठे कर्जतमध्ये शिवसेनेबरोबर युती करायची हौस आहे?” असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत विधानसभा अध्यक्ष सुधाकर घारे यांनी केला आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कर्जत तालुका पदाधिकारी आढावा बैठकीचे आयोजन शुक्रवारी (११ जुलै) रॉयला गार्डनच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वरिष्ठ नेत्यांचा आदेश मानला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. माझ्यावर व भरत भगत यांच्यावर संतोष भोईर यांच्या नावाने खोट्या तक्रारी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये केल्या होत्या.
 
मात्र संतोष भोईर यांनी मी अशा प्रकारच्या तक्रारी कधीही केल्या नाहीत, असे पोलीस स्टेशनमध्ये येऊन सांगितले. म्हणजे संतोष भोईर यांच्या नावाने कुणी खोट्या तक्रारी केल्या? असेही घारे यांनी म्हटले आहे. सुरेश टोकरे आणि भगवान चंचे यांना जेलमध्ये अडकविण्याचे काम कुणी केले? आणि त्यांना सोडविण्याचे काम कुणी केले? हे त्या दोघांनाच जाऊन विचारा. कुणाला तरी नेरळमध्ये जिल्हा परिषद निवडणूक लढवायची म्हणून हे केले असल्याचा आरोप घारे यांनी केला. निवडणुकीत पराभव झाला म्हणून मला घरी बसवले असे बोलतात; पण राष्ट्रवादीमधील एक साधा कार्यकर्तासुद्धा पक्ष सोडून गेला नाही.
 
उलट तुमच्या पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सातत्याने प्रवेश करतात. थोरवेंनी आपली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बंद करावी, असा सल्ला थोरवे यांना दिला. याप्रसंगी माजी सभापती नारायण डामसे, जिल्हा कार्याध्यक्ष अशोक भोपतराव, प्रदेश प्रतिनिधी भगवान भोईर, एकनाथ धुळे, तालुकाध्यक्ष दीपक श्रीखंडे, अजय सावंत, मनोहर पाटील, अशोक सावंत, जयवंती हिंदोळा, सुरेखा खेडकर, अ‍ॅड. रंजना धुळे, अ‍ॅड. स्वप्नील पालकर, उमेश गायकवाड, सोमनाथ ठोंबरे, भारती पालकर, मधुरा चंदन, सुवर्णा निलधे, सुनील गायकवाड, कुमार दिसले, संदीप करणूक, जयेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.
 
याप्रसंगी नव नियुक्त पदाधिकार्‍यांचा तसेच पक्ष प्रवेश करणार्‍या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. अ‍ॅड. रंजना धुळे प्रास्ताविक करताना, आदिती तटकरे यांनाच पालकमंत्री करावे, अशी मागणी केली आहे. सुरेखा खेडेकर, रवींद्र झांजे, अजय सावंत यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी नवीन नियुक्त्या केलेल्या पदाधिकार्‍यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. सूत्रसंचालन अ‍ॅड. योगेश देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन अ‍ॅड. स्वप्नील पालकर यांनी केले. याप्रसंगी सुनील घोडविंदे, प्रमोद राईलकर, मधुकर घारे, बळीराम देशमुख, शरद हजारे, हरेश घुडे, रवींद्र घारे, केतन बेलोसे, मंगल ऐनकर, दत्ता सुपे, सोमनाथ पालकर, अतुल कडू, प्रमोद देशमुख, अविनाश कडू, भरत भासे, महेंद्र घारे, प्रमोद पिंगळे, अजय पवार आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
Powered By Sangraha 9.0