मुंबई | पशुपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात पशुपालन व्यवसायास ‘कृषी व्यवसायाचा’ दर्जा देण्यात आला आहे. राज्यातील पशुपालन व्यवसायाला मोठा दिलासा देणारा हा निर्णय असून असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले, पशूपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी हा क्रांतीकारी निर्णय घेतला आहे.
या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे ७६.४१ लक्ष पशूपालक कुटुंबांना होईल. या निर्णयामुळे पशूजन्य उत्पादनातून सुमारे ७ हजार ७०० कोटी रुपये इतकी वाढ अभिप्रेत आहे. पशुपालन व्यवसायासाठी आवश्यक भागभांडवलासाठी कर्जावरील व्याज दरात ४ टक्केपर्यंत सवलत देण्यात येईल व त्यासाठी स्वयंस्पष्ट मार्गदर्शक तत्वे व कार्यपध्दती विहित करण्यात येईल आणि कृषीप्रमाणे कुक्कुटपालन व इतर पशुसंवर्धन व्यवसायासाठी सोलार पंप व इतर संच उभारण्यास सवलत देण्यात येईल.
राज्याच्या सकल उत्पन्नात कृषी क्षेत्राचा वाटा १२ टक्के आहे. कृषी क्षेत्राच्या एकूण उत्पन्नात पशूजन्य उत्पन्नाचा वाटा २४ टक्के आहे. पशूपालकांच्या आर्थिक जोखीम कमी करण्याची शिफारस केली असल्याचेही पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.